वृत्तसंस्था/ बाकू (अझरबेजान)
येथे सुरू असलेल्या फिडेच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा 17 वर्षीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने आपल्या देशाच्या अर्जुन इरिगेसीचा सडनडेथ टायब्रेकरमध्ये 5-4 अशा गुणांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. या विजयामुळे प्रज्ञानंदने पुढील वर्षी होणाऱ्या कँडीडेट्स बgिद्धबळ स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.
या स्पर्धेमध्ये आता पी. आर. प्रज्ञानंद आणि अमेरिकेचा ग्रँडमास्टर फेबियानो कारुआना यांच्यात उपांत्य लढत होणार आहे. 2024 साली होणाऱ्या कँडीडेट्स आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सध्या बाकूमध्ये सुरू असलेल्या फिडेच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अव्वल पहिले तीन बुद्धिबळपटू पात्र ठरले आहेत. टॉप सिडेड मॅग्नस कार्लसन कँडीडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चेन्नईच्या प्रज्ञानंद याची विविध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील कामगिरी अलीकडच्या दिवसात समाधानकारक होत आहे. कँडीडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत पात्र ठरणारा प्रज्ञानंद हा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू असून यापूर्वी ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने हा बहुमान मिळवला होता. बाकूमधील स्पर्धेत प्रज्ञानंदला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती तर त्यानंतर त्याने दुसऱ्या फेरीत लागेर्डीचा तर तिसऱ्या फेरीत डेव्हिड नेवाराचा पराभव केला.









