सामनावीर टीम साऊदी : 5 बळी, आर्यांश शर्मा : 60 धावा
वृत्तसंस्था/ दुबई
न्यूझीलंड आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत गुरुवारच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने संयुक्त अरब अमिरातचा 19 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात न्यूझीलंडतर्फे टीम सीफर्टने शानदार अर्धशतक तर टीम साऊदीने 5 गडी बाद केले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 20 षटकात 6 बाद 155 धावा जमवल्या. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातचा डाव 19.4 षटकात 136 धावात आटोपला. युएईने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली.

न्यूझीलंडच्या डावामध्ये सलामीच्या सीफर्टने 34 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारासह 55, क्लेव्हरने 4, चॅपमनने 18 चेंडूत 15, सँटेनरने 2, निशमने 22 चेंडूत 2 चौकारासह 25, मॅकोन्चीने 24 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 31, रचिन रविंद्रने 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 21 धावा जमवल्या. न्यूझीलंडने पॉवर प्ले दरम्यानच्या सहा षटकात 2 गडी गमावाताना 51 धावा जमवल्या. त्यांचे पहिले अर्धशतक 32 चेंडूत फलकावर लागले. क्लेव्हर आणि सीफर्ट यांनी दुसऱ्या गड्यासाठी 35 चेंडूत 51 धावांची भागीदारी केली. सीफर्टने 30 चेंडून 3 षटकार आणि 2 चौकारासह अर्धशतक झळकवले. न्यूझीलंडंचे शतक 84 चेंडूत तर दीडशतक 117 चेंडूत फलकावर लागले. न्यूझीलंडच्या डावात 4 षटकार आणि 6 चौकार नोंदवले गेले. युएईतर्फे जुनेद सिद्दकी आणि बसिल हमीद यांनी प्रत्येकी दोन तर झेवुर खान आणि मोहमद फर्जुदीन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना युएईचा डाव 19.4 षटकात 136 धावात आटोपला. सलामीच्या आर्यांश शर्माने 43 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारासह 60, व्ही. अरविंदने 10 चेंडूत 2 चौकारासह 13, असिफ खानने 10 चेंडूत 2 चौकारासह 13, टंडनने 12 चेंडूत 1 षटकारासह 12, अली नासिरने 14 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 16 धावा जमवल्या. युएईच्या डावात 3 षटकार आणि 14 चौकार नोंदवले गेले. त्यांच्या डावात अवांतराच्या रुपात 8 धावा मिळाल्या. युएईने पॉवर प्ले दरम्यानच्या सहा षटकात 59 धावा जमवताना दोन गडी बाद केले. त्यांचे पहिले अर्धशतक 34 चेंडूत तर शतक 76 चेंडूत फलकावर लागले. शर्माने 34 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारासह अर्धशतक झळकवले. या सामन्यात न्यूझीलंडतर्फे 25 धावात 5 गडी बाद करणाऱ्या टीम साऊदीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. सँटेनर आणि निशम यांनी प्रत्येकी दोन तर जेमिसनने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 20 षटकात 6 बाद 155 (सीफर्ट 55, निशम 25, मॅकोन्ची नाबाद 31, रचिन रविंद्र नाबाद 21, चॅपमन 15, सिद्दिकी आणि बसिल हमीद प्रत्येकी दोन बळी, झवूर खान आणि फरजुद्दीन प्रत्येकी एक बळी),
युएई 19.4 षटकात सर्वबाद 136 (ए. शर्मा 60, अरविंद 13, असिफ खान 13, टंडन 12, अली नासिर 16, टीम साऊदी 5-25, सँटेनर 2-22, निशम 2-15, जेमिसन 1-20).









