ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आम्ही युती सरकारमध्ये असलो तरी आमची घरं वेगळी आहेत. त्यामुळे इतरांप्रमाणे आमचं घर मजबूत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राजकीय वादळात आमचं घर पडू नये, यासाठी आम्ही स्वबळाची तयारीही सुरु केली आहे. आगामी निवडणुकीत महायुतीमध्ये स्थान न मिळाल्यास स्वतंत्रपणे 15 मतदारसंघात आम्ही स्वबळावर लढू, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
कडू म्हणाले, सध्या आम्ही महायुतीमध्ये आहोत. पण, ऐन निवडणुकीत काही दगाफटका झाल्यास, आपली तयारी असावी म्हणून आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. विदर्भ, मराठवाडय़ातील 15 मतदारसंघाची आम्ही चाचपणी केली आहे. या मतदारसंघात आमचं पक्षबांधणीचं काम सुरु आहे. आमचंही इतर पक्षांप्रमाणे होऊ नये, म्हणून हा आमचा प्रयत्न आहे.
दरम्यान, ज्या 15 मतदारसंघांची आम्ही निवड करत आहोत, तेथे उमेदवारांचीही चाचपणी सुरू आहे. तेथील उमेदवार हा शेतकरी, दिव्यांग, शेतमजूर, घरकामगार, वंचित पिछडय़ा नागरिकांसाठी काम करेल असा हवा आहे. तो वैचारिक असावा आणि त्याचं समाजात काम असावं, असेही कडू म्हणाले.








