प्रतिनिधी / बेळगाव
एसकेई सोसायटीच्या व्ही. एम. शानभाग मराठी शाळेमध्ये शिवबांच्या मावळ्यांचे कथाकथन ही स्पर्धा घेण्यात आली. प्रारंभी चौथीच्या विद्यार्थ्यांनी श्लोक म्हटले तर तिसरी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ध्येय मंत्र म्हटले. प्रमुख पाहुणे म्हणून एम. बी. हुंदरे तर अध्यक्ष म्हणून जी. डी. पाटील उपस्थित होते.
दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले. जे. के. कदम यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मण निडगलकर यांनी पाहुण्यांचा व परीक्षकांचा परिचय करून दिला. कथाकथन स्पर्धेमध्ये पहिली व दुसरीच्या गटात उत्कर्ष एल. जी., दुर्वा शिंदे, निकुंज धामणेकर यांनी तर दुसरी ते चौथीच्या गटात प्रज्ञा झिरळे, ऋग्वेद प्रभू, अद्वैव कुंभार यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. चौथी, पहिली व तिसरे इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. सूत्रसंचालन तानाजी पाटील यांनी केले. मेघना मांडेकर यांनी आभार मानले.









