बीड, पुणे / प्रतिनिधी :
सत्तेच्या बाजूला तुम्हाला जायचे असेल, तर जा. मात्र, निदान ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतले असेल, त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी तरी ठेवा, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाला सुनावले. सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना जनताच जागा दाखवेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.
बीडमधील जाहीर सभेत पवार बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, आज सत्तेचा प्रचंड गैरवापर सुरू आहे. चौकशा लावल्या जात आहेत. प्रसंगी लोकांना तुरुंगात डांबले जात आहे. त्याचबरोबर जनतेने निवडून दिलेले वेगवेगळय़ा राज्यांतील सरकार पाडले जात आहे. राजकारणाची ही वाईट चाल आहे. मात्र, सामुदायिक शक्ती एकसंघ झाली, भाजपाची सत्ता उलथून टाकायला वेळ लागणार नाही आणि ते केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.
महागाईचा प्रश्न आज बिकट आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती कुठच्या कुठे गेल्या आहेत. सध्या पावसाने ताण दिला आहे. पावसाबरोबरच बि बियाणे, खतांच्या किमतीनेही शेतकऱ्यांसमोरचे प्रश्न जटील बनले आहेत. बळीराजा अडचणीत आहे. मात्र, सरकारला त्याची कोणतीही चिंता नाही. त्यांना केवळ सरकार पाडापाडीत रस आहे. मणिपूरच्या प्रश्नावर पंतप्रधानांनी भाष्य करणे अपेक्षित होते. मात्र, येथील महिलांचे अश्रू पुसण्यास पंतप्रधानांना वेळ नाही. केवळ समाजासमाजातील अंतर वाढविणे, हाच यांचा अजेंडा आहे. ठाणे शहरात सरकारी रुग्णालयात 18 लोकांचा बळी गेला. मात्र, राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेते. यातून राज्य कुठे चाललेल, हेच कळते, अशी टीका त्यांनी केली.
अनेक वर्षांपूर्वी मी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये होतो. त्यावेळी महाराष्ट्राचे नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांच्याकडे होते. आम्ही सर्वजण त्यांच्या विचाराने काम करत होतो. त्यावेळी असा एक काळ येऊन गेला, की काही लोकांनी वेगळी भूमिका मांडायला सुरुवात केली. सामान्य लोक अस्वस्थ होते. बीड जिल्हय़ाचे नेतृत्व तेव्हा केशरकाकू क्षीरसागर यांच्याकडे होते. काकूंनी भूमिका घेतली. कोणी काहीही भूमिका घेतली, तरी नेत्याच्या विरोधात तडजोड करणार नाही. त्यासाठी काहीही किंमत मोजावी लागली, तरी मी माघार घेणार नाही. तीच भूमिका आज त्यांचे नातू संदीप क्षीरसागर यांनी या ठिकाणी घेतली, याचा मला अतिशय आनंद होत असल्याच्या भावनाही पवार यांनी व्यक्त केल्या.
माझे तुम्ही काय बघितले?
माझे वय झाले, असे म्हणता. पण तुम्ही माझे काय बघितले? सामुदायिक शक्ती उभी केल्यानंतर काय होते, हे तुम्ही पाहिलेले नाही. या जिल्हय़ाच्या भूमीत येऊन आम्ही हे करून दाखविले आहे. तुम्हाला सत्तेच्या बाजूने जायचे आहे तर जा. पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतले असेल, त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी तरी ठेवायचा प्रयत्न करा. तुम्हाला जनता निवडणुकीत जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
फडणवीसांचे मार्गदर्शन घेऊन पुढचे पाऊल टाका
पंतप्रधानांनी दिल्लीतील भाषणात पुन्हा येईन, असे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन यायचे असेल, तर मग आज आहे त्या पदाच्या खाली कुठे जायचे, याचा विचार करून तुम्ही पुढचे पाऊल टाका, असा टोलाही पवार यांनी मोदी यांना लगावला.