वृत्तसंस्था /अमान (जॉर्डन)
येथे सुरु असलेल्या 20 वर्षाखालील वयोगटाच्या पुरुष आणि महिलांच्या विश्व कुस्ती स्पर्धेत भारताचा मोहित कुमार हा 2019 नंतर पहिला कनिष्ठ गटातील विश्व चॅम्पियन मल्ल ठरला आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या विभागात भारताची महिला मल्ल प्रियाने विश्व चॅम्पियनच्या दिशेने आपली वाटचाल केली आहे. बुधवारी येथे झालेल्या पुरुषांच्या 61 किलो वजन गटातील अंतिम लढतीत भारतीय मल्ल मोहितकुमारने रशियन मल्ल इल्डेर अखमादयुनीनोव्हचा पराभव करत विश्व चॅम्पियनचा बहुमान हस्तगत केला. या अंतिम लढतीत सुरुवातीला मोहित कुमार आपला प्रतिस्पर्धी रशियन मल्लापेक्षा 0-6 अशा गुणांनी पिछाडीवर होता पण त्यानंतर जशी ही लढत पुढे सरकत गेली त्यावेळी त्याने सलग 9 गुण मिळवून रशियाच्या इल्डेरचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेच्या इतिहासामध्ये यापूर्वी म्हणजे 2019 साली भारताच्या दीपक पुनियाने विश्व कनिष्ठ चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावले होते. दीपक पुनिया आता वरिष्ठ गटातून भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे. तत्पुर्वी म्हणजे 2001 साली पलविंदर चिमाने तसेच रमेशकुमारने विश्व कनिष्ठ गटातील जेतेपद मिळवले होते. पुरुषांच्या 74 किलो वजन गटात भारताच्या जयदीपने किर्जिस्तानच्या बेटाशोव्हचा पराभव करत कास्यपदक मिळवले. या स्पर्धेमध्ये भारतीय मल्लांनी फ्रिस्टाईल प्रकारात आतापर्यंत पाच पदकांची कमाई केली आहे. 79 किलो गटात सागर जगलेनने रौप्यपदक, दीपक चहलने 97 किलो गटात तसेच सागरने 57 किलो वजनगटात कास्यपदके मिळवली. 125 किलो वजनगटात भारताच्या रजत रुहेलने कॅनडाच्या करणवीर सिंग माहिलचा पराभव करत कास्यपदक घेतले.
महिलांच्या विभागात 76 किलो वजनगटातील उपांत्य लढतीत भारताच्या प्रियाने अमेरिकेच्या केनेडी ब्लेड्सचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. आता प्रियाची अंतिम लढत जर्मनीच्या लॉरा कुहेनशी होणार आहे. या स्पर्धेतगेल्या भारताची महिला मल्ल अंतिम पांगलने 53 किलो वजनगटात विश्व चॅम्पियनचा बहुमान मिळवला होता. या स्पर्धेत आता अंतिम पांगलचा आगामी सामना पोलंडच्या विसेनीवेस्काबरोबर होणार आहे. भारताच्या अरजूने पदक फेरीमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान प्रियांशी प्रजापत (50 किलो), ज्योती (55 किलो), नितीका (59 किलो) यांचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. उपांत्य फेरीच्या लढत इलिझेवेटा पेटीयाकोव्हाने भारताच्या अरजुचा 6-3 असा पराभव केल्याने आता अरजुची लढत कास्यपदकासाठी होईल.









