वृत्तसंस्था /न्यूयॉर्क
येथील न्यूयॉर्क टेनिस क्लबच्या हार्ड कोर्टवर 28 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या 2023 सालातील शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला विभागात माजी टॉप सिडेड कॅरोलिनी वोझ्नियाकी, अमेरिकेची वयस्कर व्हिनस विल्यम्स आणि पुरुष विभागात अमेरिकेच्या जॉन इस्नेरला स्पर्धा आयोजकांनी वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश दिला आहे. डेन्मार्कच्या 33 वर्षीय कॅरोलिनी वोझ्नियाकीची 2020 नंतरची ही पहिली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा आहे. 2020 च्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेनंतर वोझ्नियाकीने आपल्या काही घरगुती समस्येमुळे निवृत्तीची घोषणा केली होती. आता तिचे या स्पर्धेद्वारे टेनिस क्षेत्रात पुनरागमन होत आहे. 2018 साली वोझ्नियाकीने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा तर 2009 आणि 2014 साली तिने अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते.
अमेरिकेची अनुभवी तसेच सातवेळा एकेरीचे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवणारी 43 वर्षीय व्हिनस विल्यम्सचे या स्पर्धेत प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळवण्याची ही 24 वी खेप आहे. 2000 आणि 2021 साली व्हिनस विल्यम्सने पाठोपाठ ही स्पर्धा जिंकली होती. व्हिनस ही सेरेना विल्यम्सची मोठी बहीण आहे. सेरेनाने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 23 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवण्याचा पराक्रम केला आहे. पुरुषांच्या विभागात 38 वर्षीय जॉन इस्नेरला या स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रमुख ड्रॉमध्ये स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. 2007 मध्ये इस्नेरने या स्पर्धेत आपले पदार्पण केले होते. त्यानंतर तो या स्पर्धेच्या प्रमुख ड्रॉमधील आपले स्थान गमवले नव्हते. जॉन इस्नेर यावेळी या स्पर्धेत 17 व्यांदा आपला सहभाग दर्शवत आहे.









