केवळ गृहिणी असणाऱ्या महिलांच्या संख्येत घट
अमेरिकेत कमाविण्यासाठी नोकरी करण्याऐवजी घरी राहणाऱ्या पुरुषांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर घरी राहणाऱ्या महिलांची संख्या कमी झाली आहे. तीन दशकांच्या अध्ययनात प्यू रिसर्चला 1989 पासून 2021 पर्यंत केवळ घरापुरती मर्यादित राहणाऱ्या महिलांची संख्या 28 टक्क्यांनी घटली आहे. तर यादरम्यान काम करण्याऐवजी घरी राहून मुलांची देखभाल करणाऱ्या पुरुषांच्या संख्येत 4 ते 7 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. या विविध ट्रेंडमुळे पुरुष आता घरी राहणाऱ्या आईवडिलांचे 18 टक्के प्रतिनिधित्व करतात. नोकरी करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत घरी राहणारे पुरुष कमीतकमी पदवीधर असण्याची शक्यता कमी असते. घरी राहणाऱ्या सुमारे 22 टक्के पुरुषांच्या शिक्षणाची पातळी कमी आहे. तर अमेरिकेत नोकरी करणाऱ्या पुरुषांमध्ये 42 टक्के जण पदवीधर आहेत. घरी राहणाऱ्या पुरुषांचे कुटुंब नोकरी करणाऱ्या पुरुषांच्या कुटुंबांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या कमी संपन्न असते. घरी राहणाऱ्या सुमारे 40 टक्के पुरुषांचे कुटुंब गरीबीत जगत असते. तर नोकरी करणाऱ्या पुरुषांप्रकरणी हा आकडा केवळ 5 टक्के आहे. घरकामापुरती मर्यादित राहणारे पुरुष कामावर जाणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत अधिक वयाचे असतात. 46 टक्के घरी राहणारे पुरुष हे 45 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. घरकामापुरती स्वत:ला मर्यादित ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये 68 टक्के विवाहित असतात. तर काम करणाऱ्या पुरुषांमध्ये 85 टक्के विवाहित असतात. महिलांमध्ये 79 टक्के जणी कुटुंबाची देखभाल तर 9 टक्के आजार किंवा दिव्यांगत्वामुळे घरी राहतात. पुरुषांमध्ये 23 टक्के जण कुटुंबाची देखभाल, 34 टक्के आजार किंवा दिव्यांगत्व, 8 टक्के शिक्षण, 13 टक्के सेवानिवृत्ती आणि 13 टक्के काम शोधण्यास असमर्थ ठरल्याने घरी असतात.









