उत्तरप्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी अजय राय : रणदीप सुरजेवाला अन् वासनिक यांना नवी जबाबदारी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
काँग्रेसने गुरुवारी पक्षसंघटनेत मोठा फेरबदल केला आहे. पक्षाने रणदीप सुरजेवाला यांना मध्यप्रदेशच्या वरिष्ठ निरीक्षक पदानंतर आता राज्याचे प्रभारी महासचिव पदाचा अतिरिक्त प्रभार दिला आहे. तर मुकुल वासनिक यांना गुजरातच्या प्रभारी महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दलित समुदायाशी संबंधित नेते बृजलाल खाबरी यांच्या जागी अजय राय यांची उत्तरप्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मध्यप्रदेश पक्ष प्रभारी महासचिवपदी यापूर्वी जे. पी. अग्रवाल कार्यरत होते. त्यांच्या जागी आता सुरजेवाला यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. तर राजस्थानचे काँग्रेस नेते रघु शर्मा यांनी राजीनामा दिल्याने वासनिक यांना गुजरात पक्ष प्रभारी महासचिवपद सोपविण्यात आले आहे. गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला होता. यामुळे रघु शर्मा यांनी प्रभारीपदाचा राजीनामा दिला होता.
चालू वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. अशा स्थितीत सुरजेवाला यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुरजेवाला यांना राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाते. याचबरोबर पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार असून गुजरातमध्ये भाजप अन् काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत अपेक्षित आहे, परंतु राज्यात आम आदमी पक्षाने प्रवेश केल्याने काँग्रेससमोरील अडचणी वाढणार आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. यामुळे राज्यात पक्षाचे बळ वाढविण्याकरता अजय राय यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशातील वाराणसी मतदारसंघात 2014 तसेच 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अजय राय यांनी निवडणूक लढविली होती. काँग्रेसने बिहार आणि झारखंडनंतर उत्तर प्रदेशात भूमिहार समुदायाशी संबंधित अजय राय यांना प्रदेशाध्यक्षपद दिले आहे. बिहार काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह आहेत. तर झारखंड काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी मिथिलेश ठाकूर यांच्याकडे आहे. भूमिहार समुदायाचे प्रमाण या तिन्ही राज्यांमध्ये लक्षणीय आहे. भूमिहार समुदायाला भाजपचा समर्थक मानले जाते. अशा स्थितीत काँग्रेस या समुदायाला स्वत:च्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करत आहे.









