आदिदासच्या मदतीने बाटा करणार प्रीमियम शूजची निर्मिती : समभाग घसरणीत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतामधील आघाडीची पादत्राणे निर्मिती करणारी कंपनी बाटा लवकरच भारतीय बाजारपेठेसाठी स्पोर्ट्सवेअर निर्मिती करणारी कंपनी आदिदाससोबत धोरणात्मक भागीदारी करण्याचा विचार करत आहे. एका अहवालानुसार सांगण्यात आले आहे, की दोन्ही कंपन्यांमधील बोलणी प्रगतीपथावर असून कराराला अंतिम स्वरुप देण्याचे काम सुरु आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये भागीदारी होणार असल्याच्या बातमीमुळे बाटा कंपनीचे समभाग हे गुरुवारच्या सत्रात 6 टक्क्यांहून अधिकने वाढल्याचे दिसून आले. यामध्ये मागील सहा महिन्यांत कंपनीच्या समभागात 20 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याची नोंद केली आहे.
भविष्यातील रोडमॅप तयार : सीईओ
कंपनीचे एमडी व सीईओ गुंजन शाह यावेळी म्हणाले, भविष्यात कंपनी आपल्या विस्तारावर भर देणार असून गुंतवणूकीसोबत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. आपल्या स्टोअर्सवर तसेच ऑनलाइन वेबसाइटवर ग्राहकांना चांगला अनुभव घेता यावा यासाठी सुधारणा केल्या जाणार आहेत. याअंतर्गत बाटा शू केअर प्रोग्रॅम, बाय नाऊ पे लेटर व बाटा वॉलेटसारख्या योजना जारी केल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात पादत्राणांच्या विक्रीत वाढीची शक्यता लक्षात घेत कंपनी टायर 3 व टायर 5 शहरांमध्येही विस्ताराची योजना बनवत असल्याचे त्यांनी सांगितले.
बाटाची देशात 2,100 पेक्षा अधिक स्टोअर्स
बाटाने स्वत:ची भारतामधील सर्वात मोठी फुटवेअर रिटेलर म्हणून ओळख निर्माण केली आहे. भारतातील 700 शहरांमध्ये 2,100पेक्षा अधिक स्टोअर्स असून याद्वारे किरकोळ नेटवर्क संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात पोहोचण्यास मदत झाली आहे.









