कर्नाटक प्रदेश काँग्रेस सदस्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत 20 हून अधिक जागा पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मिळवण्याचा संकल्प सर्वासमक्ष करण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून भाजपच्या गळाला लागलेल्या आमदारांच्या घरवापसीसाठी रिव्हर्स ऑपरेशन राबवले जात असून त्याला कितपत यश मिळते, हे पाहावे लागणार आहे. दुसरीकडे सिद्धरामय्या हे अडीच वर्षेच मुख्यमंत्री असणार आहेत, हेही अधोरेखीत होताना दिसते आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेस सदस्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या व इतर नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत 20+ जागांवर विजय मिळविण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी झालेल्या या बैठकीत सत्तावाटपाचा मुद्दाही ठळक चर्चेत आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर 2025 ला मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ बदलणार आहे, असे सूतोवाच मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी केले आहे. नव्या मंत्र्यांना वगळून अडीच वर्षांनंतर आम्हाला सत्तात्याग करावा लागणार आहे. तो अनिवार्य आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत के. एच. मुनियप्पा यांनी केलेल्या विधानाने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करताना सत्तावाटपाचे अडीच वर्षांचे सूत्र ठरले होते, हे अधोरेखित झाले आहे. म्हणूनच की काय, सिद्धरामय्या समर्थक मंत्री, आमदार वारंवार पुढील पाच वर्षे सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री असतील, असा राग आळवत आहेत. एकंदर लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात काँग्रेस सरकार भाग-2 चा प्रयोग होणार, हे निश्चित आहे.
राजकारण नेहमी विकासाभिमुख असते. एखाद्या पक्षाच्या नेत्याला दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा असेल तर आपल्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा मतदारसंघाच्या विकासासाठी पक्षांतर केल्याचे सांगून पक्षांतराचे समर्थन करताना दिसतात. असे समर्थन करीत काँग्रेस व निजदमधील 17 आमदारांनी राजीनामे देऊन ऑपरेशन कमळच्या गळाला लागल्यामुळे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-निजदच्या युती सरकारचा पाडाव झाला. या 17 आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला. म्हणून कर्नाटकात पुन्हा भाजप सत्तेवर आले. भाजपच्या गळाला लागलेल्या 17 पैकी काही आमदारांना आता काँग्रेसने गळ घातली आहे. गेले तीन-चार दिवस कर्नाटकातील या रिव्हर्स ऑपरेशनची चर्चा सुरू आहे. माजी मंत्री एस. टी. सोमशेखर यांच्यासह काही आमदारांची घरवापसी होणार यासाठी हालचाली सुरू आहेत. गुरुवारी सोमशेखर यांनी आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चाही केली आहे. या बैठकीनंतर आपले कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी आपल्यालाही काँग्रेस प्रवेशाची सूचना केली आहे. पण आपणच चार दिवस थांबा, वरिष्ठांशी चर्चा करतो, असे सांगत मुदत घेतली आहे, असे सोमशेखर यांनी जाहीर केले आहे. भाजप असो किंवा काँग्रेस, उपरे आणि मूळ कार्यकर्ते यांच्यातील वाद असतो आणि आहेच. काँग्रेसमध्ये जम बसविण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व त्यांच्या समर्थकांना बराच संघर्ष करावा लागला आहे. शेवटी उपरे अशीच त्यांची ओळख होती. स्वत:च्या ताकदीवर त्यांनी काँग्रेसमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांची परिस्थितीही अशीच झाली आहे. आपण राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस-निजद युतीचा पराभव झाला. पण सध्या पूर्ण ताकदीने काँग्रेसला सत्ता मिळाली आहे. अशा परिस्थितीत आम्ही काय करणार? या विचाराने ते 17 जण त्रस्त आहेत. सत्तेसाठी तरी सारे खटाटोप झाले होते. आता सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा आपली अवस्था पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी झाली आहे. पुन्हा सत्तेच्या तलावात त्यांना पोहायचे आहे. त्यामुळेच काही जणांनी घरवापसीची मानसिक तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून अद्याप न सावरलेल्या भाजप नेत्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी धक्का देण्यासाठी रिव्हर्स ऑपरेशनची तयारी काँग्रेस नेत्यांनी केली आहे.
खरेतर काँग्रेसला आता ऑपरेशन राबविण्याची गरज नाही. 135 चे संख्याबळ हातात आहे. तरीही लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हायकमांडने दिलेले 20+ चे लक्ष्य गाठण्यासाठी जे आवश्यक आहे ते करण्याची तयारी काँग्रेसजनांनी ठेवली आहे. त्यामुळेच एस. टी. सोमशेखर यांच्यासह आणखी काही प्रभावी आमदारांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत. एकीकडे 17 पैकी काही आमदारांनी काँग्रेस प्रवेशाची तयारी सुरू केली असतानाच दुसरीकडे माजी मंत्री मुनिरत्ना यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही. हवे तर राजकारणातून निवृत्ती स्वीकारणे पसंत करेन. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे जाहीर केले आहे. काँग्रेस हायकमांडला कर्नाटकातील नेतृत्वाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. कर्नाटकातील मतदारांनी भाजपला बाजूला काढून काँग्रेसच्या हाती सत्ता दिली. याच राजकीय परिस्थितीचा लोकसभा निवडणुकीतही लाभ उठविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या नेत्यांना पक्षात घेतल्यावर जेथे विजय सुलभ वाटतो, त्याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानुसार रिव्हर्स ऑपरेशन राबविण्यात येणार आहे. कर्नाटकातील सध्याच्या राजकीय घडामोडी लक्षात घेता लवकरच काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले काही आमदार पुन्हा काँग्रेसवासी होणार, हे स्पष्ट आहे. माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी भाजप आमदारांच्या काँग्रेस प्रवेशाचा इन्कार केला आहे. तशी शक्यताच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अशा घडामोडींमुळे लोकसभा निवडणुकीच्या आधीच भाजपमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता आहे. विधानसभेतील पराभवामुळे केंद्रीय नेत्यांनी तर कर्नाटकाबाबत अद्याप कोणतेच निर्णय घेतलेले नाहीत. म्हणून विरोधी पक्षनेत्याविना विधिमंडळाचे अधिवेशनही झाले. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नावाच्या ब्रँडचाच आधार आहे. निवडणुकीतील पराभवानंतर गटबाजीही उफाळली आहे. भाजप नेते कर्नाटकातील परिस्थिती कशी हाताळणार? याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. एकीकडे ऑपरेशन ‘रिव्हर्स ऑपरेशन’ची चर्चा सुरू आहे. कर्नाटकात वीज, बस मोफतच्या योजना सुरू आहेत. सरकारी इस्पितळात मात्र औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासतो आहे. चालू वर्षी 600 कोटी रुपयांच्या 733 औषधांना आरोग्य विभागाकडून मागणीही आली आहे. मात्र, या मागणीची अद्याप पूर्तता करण्यात आली नाही. म्हणून सरकारी इस्पितळात औषधांचा तुटवडा भासतो आहे. प्रदीर्घ आजारांवरील औषधे गायब झाली आहेत. निविदा प्रक्रियेतील घोळामुळे ही परिस्थिती उद्भवली की औषध खरेदीसाठी निधीची कमतरता आहे? याचा उलगडा झाला नाही.








