हिरवे हिरवे गार गालिचे, हरिततृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती असे कवीने श्रावणाचे वर्णन केले असले तरी यंदा पाऊस नाही, रोगराई वाढली, राजकारणाचा सर्वदूर चिखल झाला आहे. महागाईचा निर्देशांक सात टक्के पार झाला आहे. गैरव्यवहार, भ्रष्टाचार यांना उत आला आहे. कायदा-सुव्यवस्थेसह अनेक प्रश्न तीव्र आहेत, असे श्रावणाचे वर्तमान दिसते आहे. ओघानेच या ‘श्रावण झळा’ सर्वसामान्यांना पोळून काढत आहेत. या साऱ्या वणव्यात भारताचे चांद्रयान चंद्राच्या समीप पोहोचले आहे. निर्धारीत योजनेनुसार ते काम करत आहे व लवकरच ते चंद्राच्या आजवरच्या अपरिचित भूभागावर उतारणार हे निश्चित झाले आहे. तीच एक या साऱ्या वणव्यात हळूवार,सुखद व गौरवास्पद झुळूक आहे. जूनमध्ये पावसाला सुरूवात होते आणि 15 ऑगस्टच्या झेंडावंदनापर्यंत चांगला पाऊस, नदीला एक-दोन पूर येऊन पिण्याच्या, शेतीच्या, उद्योगाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागतो. कोयनेसह इतरत्र जलविद्युत पूर्ण क्षमतेने तयार होते. पण, यंदा खरीप हंगाम पावसाअभावी अडचणीत आला आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात यंदा पेरण्या झाल्या नाहीत. काही ठिकाणी दुबार पेरणी झाली. तीही अडचणीत आहे. पाऊस नाही, दमट उष्ण हवामान ओघानेच पिकांवर रोगराई आहे. माणसेही विविध साथीच्या आजारांना बळी पडताना दिसत आहेत. डोळ्याची साथ बळावली आहे. महागाई, बेरोजगारी, उद्योग व्यवसाय, शेती, व्यापार अनेक प्रश्न तीव्र आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवनव्या योजना आणि मोठ-मोठ्या रक्कमाची घोषणा करत आहेत. नितीन गडकरीही तसेच बोलतात. रस्ते, विमानतळे ही कामे सुरू असली तरी संघटीत, सुरक्षित सरकारी कर्मचारी सोडता फार कुणाला अच्छे दिन दिसत नाहीत. राजकारणाचा मुख्य हेतू हा समाजकल्याण, कल्याणकारी राज्य व रांगेतील शेवटच्या माणसापर्यंत सोयी-सुविधा हा असतो नव्हे असला पाहिजे. पण, देशात आणि विशेष करून महाराष्ट्रात काय चालले आहे. याकडे पाहिले असता केवळ आणि केवळ अंधार, एकमेकावर चिखलफेक, पाय ओढा-ओढी आणि सत्तासंपत्तीसाठी काहीही या पलीकडे फारसे काही होत नाही. यात दोष कुणा एका नेत्याचा किंवा पक्षाचा नाही. सारेच एकाच माळेचे मणी आहेत. काल कोणत्या पक्षात, आज कोणत्या पक्षात, कुणाची चौकशी, कुणावर भ्रष्टाचाराचा आरोप, रात्रीत साफसफाई आणि मंत्रीपद त्यामुळे सामान्य माणसाचा राजकारणावरचा आणि नेत्यावरचा विश्वास संपला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपची महाराष्ट्रातील आजची अवस्था बघता. एकेकाळची बदनाम काँग्रेस पार्टी बरी असे म्हणायची वेळ आली आहे. शिवसेनेचे दोन गट. दोन नावांनी वावरत आहेत. एका पेक्षा एक एकमेकावर राड उडविण्यात धन्यता मानत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे वेगवेगळ्या आरोपाखाली, वेगवेगळ्या वाऱ्या करून आलेले नेते लाल दिव्याच्या गाड्यातून हिंडत आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंडळींची जामिनावर सुटका झाली. ही त्यांच्या स्वागताला मोठमोठे नेते आणि लाभार्थी गर्दी करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात शरद पवार आणि अजित पवार लोकसभा, विधानसभा निवडणुकीपर्यंत कोणती भूमिका घेणार हे त्यांनाही नक्की माहिती आहे का हा प्रश्न आहे. रात्रीच्या अंधारात मोठ-मोठ्या उद्योगपतींच्या बंगल्यात ही मंडळी भेटतात, वेगवेगळ्या ऑफरची चर्चा करतात. फायदा-तोटा जोखला जातो आणि मतदारांना गृहीत धरून संभ्रम निर्माण करण्यात शहाणपणा मानतात. पहाटेचा शपथविधी ही आपली चाल होती वगैरे नंतर सांगून आपण राजकारण चतूर असल्याचे भासवले जाते. आता या आणि अशा राजकारणाची उद्धव ठाकरेसह भाजपला, काँग्रेसला आणि मतदारांनाही कल्पना आली आहे. सोईने खंजीर पाठीत मारणे आणि सोईने त्याला राजकारण म्हणणे हे संबंधितांना योग्य व सोईचे असले तरी मतदार या संभ्रमांना वैतागले आहेत. ते मतदानाची संधी मिळताच या साऱ्या अनुभवांना कसे सामोरे जाणार हा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर आणि स्वराज्य पक्षाशी केलेली हातमिळवणी पुरेशी बोलकी आहे. ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व 48 जागा स्वतंत्र लढवायच्या दृष्टीने मातोश्रीवर मुलाखती व मतदारसंघ निहाय आढावा, बैठका सुरू केल्या आहेत. काँग्रेसनेही सर्व शक्यता समोर ठेवल्या आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर राज्यात बहुरंगी लढती होणार असे दिसत असले तरी त्याचा फायदा कोणाला होणार हे कोणालाच सांगता येत नाही. कारण, भाजपसह सर्वांची विश्वासहार्ता अडचणीत आहे. ‘पार्टी विथ डिफरन्स’ हे केव्हाच अडगळीत गेले आहे. भरपूर पाणी वाहून गेल्याने आता जुन्या मतदानाची आकडेवारी व सोईच्या मतदार चाचण्याचे सारे अंदाज फसवे ठरणार आहेत. शरद पवारांनी आपण भाजपबरोबर जाणार नाही. इंडिया आघाडीतून भाजपला पर्याय देणार असे म्हटले आहे. तर अजितदादा पवार शासन तुमच्या दारी असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदीचे तोंड फाटेपर्यंत कौतुक करत आहेत. जातीय राजकारण, नवनवी समीकरणे आणि मतांची बेरीज, वजाबाकी हे सारे आहेच. राजकारणात तोच खेळ सुरू आहे. इंडिया आघाडी इतक्या परस्पर विरोधांनी भरली आहे. ही सर्कस उभी करणे वाटते तितके सोपे नाही. आणि याचा अंदाज असल्यानेच इंडिया आघाडीच्या घटक पक्षाने जिल्हानिहाय आढावा घेणे सुरू केले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना शरद पवारांबद्दल जितके चांगले बोलता येईल तितके त्यांनी बोलून घेतले व आता उलटे कीर्तन सुरू केले आहे. एकूणच खरीप हंगाम, शेतीव्यापार जसा श्रावण झळांनी पोळतो आहे, तसे राजकारणही पोळते आहे. लोककल्याण हा राजकारणाचा केंद्रबिंदू केव्हाच नष्ट झाला आहे. या सगळ्या झळीत आनंददायी झुळूक म्हणजेच इस्त्रोची कामगिरी, भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राच्या अखेरच्या कक्षेत पोहोचले आहे. तिथून चंद्राची माहिती व विविध चित्रे पाठवत आहे. आणि इस्त्रोच्या या कामगिरीवर जग फिदा आहे. नवे तंत्रज्ञान व सायन्स वापरून इस्त्रोने कमी खर्चात साधलेली कामगिरी थक्क करणारी आहे. श्रावण झळींनी पोळत असताना इस्त्रोच्या कामगिरीची ही झुळूक सुखदायक ठरली आहे. इस्त्रोच्या या यशात गगनभरारीच्या नवनव्या संधी निर्माण झाली आहेत. सर्वांचे लक्ष आता चांद्रयान 3 चंद्रांवर उतरण्यावर लागले आहे.
Previous Articleबहुआयामी दारिद्र्या घट-आभासी वास्तव
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








