सभागृहात चुकीची माहिती दिल्याने विरोधी गटाच्या नगरसेवकांनी व्यक्त केली नाराजी
प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेमध्ये कायदा सल्लागार अॅड. यू. डी. महांतशेट्टी यांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सभागृहात दिशाभूल करण्याची माहिती दिली आहे. त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्याचवेळेला त्यांनी सभागृहातील नगरसेवकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे विरोधी गटातील नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात जोरदार आक्षेप घेतला आहे.
म. ए. समितीच्या नगरसेवकांना मराठीत नोटिसा देण्यात आल्या नाहीत, यावर विचारले असता राज्यभाषा ही महत्त्वाची आहे. त्यानंतर राज्यभाषा न समजणाऱ्यांना इंग्रजी भाषेतून नोटिसा दिल्या असल्याचे सांगितले. यावेळी यापूर्वी किती भाषांतून नोटिसा दिल्या आहेत? असा प्रश्न विरोधी गटातील नगरसेवकांनी तसेच आमदार राजू सेठ यांनी विचारला. त्यावर कन्नड व इंग्रजी भाषांतूनच नोटिसा दिल्या आहेत, असे सांगितले. त्यानंतर मराठी भाषेतून पूर्वी दिलेल्या नोटिसाच नगरसेवकांनी त्यांच्याकडे दिल्याने कायदा सल्लागारांची चांगलीच कोंडी झाली. त्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे पितळ उघडे पडले.
सर्वसाधारण सभेची नोटीस किती दिवस अगोदर दिली पाहिजे, याची माहिती नगरसेवक रियाज किल्लेदार यांनी विचारली. त्यावर देखील कायदा सल्लागार अॅड. महांतशेट्टी यांनी दिशाभूल करण्याची माहिती सभागृहात दिली. आम्ही कधीही तुम्हाला नोटीस देऊ शकतो, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचे म्हणजे कायद्याचे पुस्तक घेऊन त्यांनी त्याचे वाचन केले. मात्र आपण काय वाचलो, याचीच माहिती त्या कायदेतज्ञांना नसल्याचे दिसून आले. कधी सहा दिवस अगोदर, कधी चोवीस तास अगोदर अशी उत्तरे देऊन त्यांनी एक प्रकारे साऱ्यांचीच दिशाभूल केली.
सभागृहामध्ये हा चाललेला सर्व प्रकार पाहून विरोधी गटातील नगरसेवकांनीही कायद्याचे पुस्तक आणले. आमदार राजू सेठ यांनी त्याचे वाचन करून कायदा सल्लागार कसे दिशाभूल करीत आहेत, हे दाखवून दिले. एकूणच या सभेमध्ये कायदा सल्लागार महांतशेट्टी यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. भाजपच्या सत्ताधारी नगरसेवकांच्या सांगण्यावरून त्यांनी ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे सभागृहात दिसून आले. मात्र सारेच उघड्यावर पडल्याने गोंधळ उडाला.