जिल्हाधिकारी परिसरात रहदारी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर रहदारी पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र एका दुचाकीस्वाराकडे दंड भरण्यासाठी पैसे नसल्याने दुचाकी काढून घेण्यात आल्याचा प्रकार घडला. यामुळे दुचाकीस्वाराला नाहक त्रास सहन करावा लागला आहे. ही कारवाई रहदारी पोलिसांच्या नियमात बसते का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
काटबाळी (ता. हुक्केरी) येथील दोन तरुण न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयात आले होते. न्यायालयातील काम संपवून ते तरुण दुचाकीवरून प्रादेशिक आयुक्त कार्यालयासमोरून जिल्हा पंचायत कार्यालयाकडे जात होते. दरम्यान सेवा बजावणाऱ्या रहदारी विभागाच्या महिला पोलिसांकडून त्या तरुणांची अडवणूक करण्यात आली. हेल्मेट परिधान करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले. यावरून दुचाकी रोखण्यात आली. हेल्मेट नसल्याने पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
दरम्यान तरुणांनी आपण न्यायालयीन कामकाजासाठी आलो असून आपल्याकडे दंड भरण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले. पोलिसांनी तरुणांचे काहीच न ऐकता दुचाकी काढून घेतली. दंड भरा त्यानंतरच दुचाकी सोडू, असा पवित्रा पोलिसांनी घेतला. खिशामध्ये पैसे नसल्याने तरुणांनी दुचाकी सोडण्यासाठी पोलिसांकडे गयावया केली. मात्र पोलिसांनी मानले नाही. तरुणांनी फोनाफोनी केली. पण काहीच निभाव लागला नाही. जवळपास एक तास प्रयत्न करूनही तरुणांच्या विनवणीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. इतक्यात दुसऱ्या एका रहदारी पोलिसाने तरुणांची दुचाकी पोलीस स्थानकात नेऊन ठेवली.
हेल्मेट नसल्याने दुचाकी काढून घेण्याचा अधिकार पोलिसांना आहे का?
आपल्याकडे पैसे नाहीत, दंडाची पावती द्या, न्यायालयात दंड भरू, अशी विनवणी केली असली तरी दुचाकी देण्यात आली नाही. शेवटी महिला पोलीस व सदर तरुण पुन्हा रिक्षाने पोलीस स्थानकात गेले. हा सर्व प्रकार प्रादेशिक आयुक्त कार्यालयासमोर घडल्याने उपस्थितांकडून याचे बराच वेळ निरीक्षण करण्यात आले. हेल्मेट नसल्याने दुचाकी काढून घेण्याचा अधिकार पोलिसांना आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र पैसे नसलेल्याची दुचाकी काढून घेण्याचा हा पोलिसांचा प्रकार योग्य आहे का? यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.