मनपाच्या सभागृहात महापौरांच्या असनासमोर धरणे आंदोलन, मात्र बेगडी प्रेम करणाऱ्यांची झाली पोलखोल
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेमध्ये भाषेवरुन राजकारण नको म्हणून सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेवकांने तिन्ही भाषेमध्ये नगरसेवकांना नोटीस द्यावी, अशी मागणी केली. त्याला महापौरांनी होकार दिला होता. मात्र त्यानंतरही दुसऱ्या सर्वसाधारण सभेची नोटीस केवळ कन्नड आणि इंग्रजी भाषेतून देण्यात आली. ती नोटीस म. ए. समितीच्या नगरसेवकांनी नाकारली. त्याचबरोबर बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये त्याचा निषेध नोंदवत महापौरांच्या आसनासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. आणि आपली मराठी भाषेची अस्मिता दाखवून दिली. मात्र याचवेळी सत्ताधारी भाजपच्या पक्षातील मराठी नगरसेवकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे मराठी भाषेचे बेगडी प्रेम उघड्यावर पडले आहे.
बुधवारी सर्वसाधारण सभा पार पडली. सभेला सुरुवात होताच म. ए.समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी महापौर शोभा सोमनाचे यांना मराठीतून नोटीस का देण्यात आल्या नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर त्यांनी मराठी भाषांतरकार नसल्यामुळे समस्या झाल्याचे सांगितले. मात्र नगरसेवक रवी साळुंखे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी महापौरांच्या आसनासमोरच ठाण मांडून धरणे आंदोलन केले. यामुळे मोठा गेंधळ उडाला.
सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी त्याविरोधात जोरदार आवाज उठविला. मराठी भाषिकांच्या मतांवर निवडून येऊन मराठीसाठी आंदोलन छेडणाऱ्या नगरसेवकांनाच जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता त्यांचे पोलखोल झाले आहे. मराठी भाषेविषयीची बेगडी प्रेम उघड्यावर पडले असून आता भविष्यात या नगरसेवकांना मराठी भाषिकांनी हिसका दाखविण्याची वेळ यावरून आली आहे. खुद्द महापौरच शोभा सोमनाचे याच मराठी भाषेतूनच सभेला सुरुवात केली असे असताना केवळ राजकीय दबावातून मराठी विरोधपण दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
विरोधी गटातील नगरसेवकांनीही आवाज उठविला
सत्ताधारी नगरसेवकांनी आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांनी अवमान केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. मात्र त्यावेळी विरोधी गटातील नगरसेवकांनीही जोरदार आवाज उठविला. आजपर्यंत ज्या पद्धतीने सभागृहाचे कामकाज सुरु आहे, त्यापद्धतीने झाले पाहिजे. आजपर्यंत तीन भाषेतून नोटिसा देण्यात आल्याचे पुरावेदेखील विरोधी गटाच्या नगरसेवकांनी महापौरांना दिल्या. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांची चांगली गोची निर्माण झाली.
आमदार राजू सेठ यांचीही जोरदार मागणी
आमदार राजू सेठ यांनीही आम्ही येथे राजकारण करण्यासाठी आलो नाही. तर शहराचा विकास करायचा आहे, असे ठणकावून सांगत या ठिकाणी आजपर्यंत ज्या पद्धतीने नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्याच पद्धतीने नोटिसा द्याव्यात, अशी जोरदार मागणी केली. काहीजण सभागृहामध्ये आम्ही सर्व श्रेष्ठ आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आमदार राजू सेठ यांनी त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला. शेवटी महापौर शोभा सोमनाचे यांनी पुढील बैठकीत मराठीतूनही नोटिसा देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आमदार राजू सेठ यांनी आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांना आंदोलन मागे घ्या, अशी विनंती केली. त्यांच्या या विनंतीला म. ए. समितीच्या नगरसेवकांनी होकार देत, आंदोलन मागे घेतले. आणि आपल्या जागेवर जाऊन बसले. मात्र या प्रकारावरून भाजपच मराठी भाषिकांच्या विरोधात असल्याचे दिसून आले.









