दुखापतीमुळे घेतला निर्णय : 53 किलो गटात अंतिम पंघल होणार सहभागी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळालेल्या स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने गुडघ्याच्या दुखापतीमुळे चीनमध्ये होणाऱ्या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा तिने मंगळवारी केली. आता, 53 किलो गटात तिच्या जागी राखीव खेळाडू अंतिम पंघल सहभागी होणार आहे.
जकार्ता येथे 2018 रोजी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या विनेशने ‘ट्विटर‘च्या माध्यमातून दुखापतीबाबत माहिती दिली. 13 ऑगस्ट रोजी माझ्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. आज, 17 ऑगस्ट रोजी मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे आशियाई स्पर्धेसह पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही मी सहभागी होऊ शकणार नाही, असे ट्विट तिने केले आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला ऑलम्पिक पात्रतेचा दर्जा आहे. दुखापतीमुळे महिनाभर विश्रांती घ्यावी लागणार असल्याने विनेशला आता पॅरिस ऑलम्पिकसाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.
अलीकडेच विनेश व बजंरग पुनिया यांना आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीत सूट दिल्याने वाद निर्माण झाला होता. भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्राया हंगामी समितीने हा निर्णय घेतला होता. विनेशच्या दुखापतीमुळे आता 53 किलो गटात राखीव खेळाडू असलेली अंतिम पंघल आशियाई स्पर्धेत सहभागी होईल. तिने 53 किलो गटाच्या निवड चाचणीत शानदार विजय मिळवला आहे.









