याच महिन्यात होणाऱ्या आशियाई वर्ल्ड कप फाईव्ज पात्रता स्पर्धेत भाग घेणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियाई हाकी फाईव्ज विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी भारताने पुरुष व महिला हॉकी संघ जाहीर केले असून मनदीप मोर व नवजोत कौर यांच्याकडे या संघांचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
आशियाई पात्रतेची पुरुष विभागाची स्पर्धा 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत तर महिलांची स्पर्धा 25 ते 28 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. मिडफिल्डर मोहम्मद राहील मौदीन याच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुरुष संघात गोलरक्षक सुरज करकेरा असून जुगराज सिंग, दिप्सन तिर्की, मनजत व मनदीप मोर हे बचावफळीत खेळतील. मिडफिल्डची जबाबदारी मनिंदर सिंग, मौदीनकडे तर आघाडी फळीची जबाबदारी पवन राजभर, गुरजोत सिंग सांभाळतील. याशिवाय प्रशांत कुमार चौहान, सुखविंदर, आदित्य सिंग, अरुण सहानी यांना राखीव म्हणून निवडण्यात आले आहे. जनार्दन सीबी हे प्रशिक्षक संघासोबत जातील.
‘आपला संघ समतोल असून अनेक प्रतिभावान खेळाडूंचा त्यात समावेश असल्याने प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. हॉकी फाईव्ज वर्ल्ड कपची पात्रता पणाला लागली असल्याने सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचाच संघाने निर्धार केला आहे,’ असे प्रशिक्षक जनार्दन म्हणाले.
महिला संघाच्या उपकर्णधारपदी ज्योतीची नियुक्ती करण्यात आली आहे. या महिला हॉकी फाईव्ज संघात गोलरक्षक म्हणून बन्सरी सोळंकी तर बॅकलाईनमध्ये अक्षता आबासो ढेकळे, महिमा चौधरी, सोनिया देवी क्षेत्रीमयुम यांना स्थान मिळाले आहे. मारियाना कुजुर, ज्योती, दीपिका मोनिका टोपो स्ट्रायकर्स म्हणून काम पाहतील. कुरमापू रम्या, निशी यादव, प्रियांका यादव, रितन्या साहू यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
‘या स्पर्धेची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत, सर्व खेळाडू सज्ज झाले असून सर्वानी जोरदार सराव केला असल्याने आत्मविश्वास दुणावलेला आहे. या संघात अनुभवी व युवा खेळाडूंचे मिश्रण असून या स्पर्धेत आपला संघ सर्वोत्तम कामगिरी करेल, असे मला वाटते,’ असे या संघाच्या प्रशिक्षिका सौंदर्या येन्डाला म्हणाल्या.
पुरुष हॉकी फाईव्ज संघ : सुरज करकेरा, जुगराज सिंग, दिप्सन तिर्की, मनजीत, मनदीप मोर (कर्णधार), मनिंदर सिंग, मोहम्मद राहील मौदीन, पवन राजभर, गुरजोत सिंग. राखीव : प्रशांत कुमार, चौहान, सुखविंदर, आदित्य, अरुण सहानी.
महिला हॉकी फाईव्ज संघ : बन्सरी सोळंकी, अक्षता आबासो ढेकळे, महिमा चौधरी, सोनिया देवी क्षेत्रिमयुम, नवजोत कौर (कर्णधार), अजमिना कुजुर, मारियाना कुजुर, ज्योती, दिपी मोनिका टोपो. राखीव : कुर्मापू रम्या, निशी यादव, प्रियांका यादव, रितन्या साहू.