वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या 7 लोकसभा मतदारसंघांकरता आम आदमी पक्षासोबत काँग्रेस आघाडी करणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी आम आदमी पक्ष हा भाजपची बी टीम असल्याचा पुनरुच्चार केला आहे. दीक्षित हे बुधवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांनी बोलाविलेल्या दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत भाग घेतला होता. दिल्लीच्या 7 लोकसभा मतदारसंघांकरता काँग्रेस अणि आप यांच्यात आघाडी होणार नसल्याचे संकेत दीक्षित यांनी दिले आहेत.
दिल्लीत काँग्रेसला आघाडी करण्याची गरज नाही. अरविंद केजरीवाल हे भीतीपोटीच विरोधी पक्षांच्या आघाडीत सामील झाले आहेत असा आरोप दीक्षित यांनी केला आहे. खर्गे आणि राहुल गांधी यांनी बोलाविलेल्या या बैठकीत आप अन् काँग्रेसमधील दिल्लीतील आघाडीसंबंधी निर्णय होण्याची शक्यता यापूर्वी व्यक्त करण्यात आली होती. परंतु दिल्लीतील नेत्यांनी आप सोबत आघाडी करण्यास विरोध दर्शविला असल्याचे समजते. या बैठकीत अनिल चौधरी अणि अजय माकन यांच्यासोबत दिल्ली काँग्रेसचे सुमारे 30 नेते सामील झाले आहेत.









