बारावीच्या तुलनेत दहावी परीक्षेत कॉपीचे प्रमाण अधिक : 500 हून अधिक केंद्रे रद्द करण्याचा निर्णय
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यासह राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये मागीलवर्षी दहावी परीक्षेत सामूहिक कॉपीचे प्रकार घडले होते. यामध्ये 38 हून अधिक पर्यवेक्षकांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे पुढीलवर्षी सामूहिक कॉपीचे प्रकार घडू नयेत, यासाठी शिक्षण विभागाने 500 हून अधिक परीक्षा केंद्रे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याठिकाणी सर्वाधिक कॉपी होण्याचे प्रकार आढळले आहेत, तेथील परीक्षा केंद्र रद्द केले आहे. दहावी परीक्षेत कॉपीचे प्रमाण वाढले आहे. मागीलवर्षी सामूहिक कॉपी करण्यास पर्यवेक्षकच मदत करत असल्याचा प्रकार बेळगाव जिल्ह्यातील बागेवाडी येथे घडला होता. सामूहिक कॉपीला सहकार्य केल्याबद्दल काही पर्यवेक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. बेळगावसोबतच बागलकोट, बिदर या जिल्ह्यांमध्येही कॉपीचे प्रमाण वाढले असल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आले आहे.
ज्या परीक्षा केंद्रांवर सहजासहजी कॉपी करणे शक्य आहे, अशा परीक्षा केंद्रांचा शिक्षण विभागाने सर्व्हे केला. राज्यातील अशा 500 परीक्षा केंद्रांची सूची तयार केली असून या परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द केली जाणार आहे. या परीक्षा केंद्रातील विद्यार्थी दहा किलोमीटर परिघातील इतर परीक्षा केंद्रांमध्ये वर्ग केले जाणार आहेत. पीयुसीच्या तुलनेत दहावी परीक्षा केंद्रे तिप्पट आहेत. मागीलवर्षाच्या दहावी व बारावी परीक्षेचा विचार करता बारावीपेक्षा दहावीला केवळ 1 लाख विद्यार्थी अधिक होते. असे असताना परीक्षा केंद्रे मात्र तिप्पट आहेत. मागीलवर्षी दहावीच्या 8 लाख 35 हजार विद्यार्थ्यांनी 3,305 परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिल्या. तर बारावीच्या 7 लाख 2 हजार विद्यार्थ्यांनी 1,109 परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिल्या. त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्या कमी करण्याचा विचार केला जात आहे.
प्रत्येक परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवणे शक्य- रितेश कुमार सिंग (मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग)
परीक्षा केंद्रांची संख्या अधिक असल्यामुळे प्रत्येक परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचणे अवघड जाते. त्यामुळे पीयुसीच्या धर्तीवर परीक्षा केंद्रांची संख्या कमी करण्याचा विचार शिक्षण विभागाकडून सुरू आहे. यामुळे प्रत्येक परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवणे सोयीचे होईल.









