अॅड. एम. जी. पाटील यांची माहिती : कागदपत्रे मिळविण्यासाठी धडपड
बेळगाव : रिंगरोडविरोधात शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी पूर्ण ती तयारी केली आहे. सोमवार दि. 21 रोजी उच्च न्यायालयात आपला दावा दाखल करणार आहेत, अशी माहिती अॅड. एम. जी. पाटील यांनी दिली आहे. रिंगरोडबाबत नुकतेच थ्रीडी नोटिफिकेशन देण्यात आले आहे. यापूर्वी 32 गावांतील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आपल्या हरकती दाखल केल्या होत्या. मात्र त्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. थ्रीडी नोटिफिकेशन दिल्यामुळे ती जमीन कब्जात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र शेतकरी त्याविरोधात लढा लढणार हे निश्चित आहे.
रिंगरोडमध्ये 1200 हून अधिक एकर जमीन जाणार आहे. ती सर्व जमीन सुपीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. अॅड. एम. जी. पाटील, अॅड. शाम पाटील, अॅड. प्रसाद सडेकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण हे शेतकऱ्यांच्यावतीने लढा लढणार आहेत. तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे जमा केली आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काही कागदपत्रे मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रांताधिकाऱ्यांनी फेटाळलेल्या याचिकेची कागदपत्रे देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. मात्र वकिलांनी याबाबत काही कागदपत्रे जमविली असून लवकरच दावा दाखल करणार असल्याचे अॅड. एम. जी. पाटील यांनी सांगितले आहे.









