नात्यातील तरुणाकडूनच दरोड्याचा कट : आणखी एका फरारीचा शोध जारी
बेळगाव : गळतगा, ता. चिकोडी येथील दरोडाप्रकरणी चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. सदलगा पोलिसांनी ही कारवाई केली असून या टोळीतील आणखी एका फरारी आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. सदाशिव गुंडू पाटील (वय 45) रा. म्हसवड, ता. माण, जि. सातारा, दीपककुमार जवाहर यादव (वय 27) रा. जडिया, ता. त्रिवेणीगंज, बिहार, मारुती निलप्पा दिंडीलकोप्प (वय 23) रा. मरणहोळ, ता. बेळगाव, तुकाराम पांडुरंग पाटील (वय 23) रा. व्होळेवाडी, ता. गडहिंग्लज अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अथणीचे पोलीस उपअधीक्षक श्रीपाद जलदे यांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगुले, सदलग्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. गळतगा येथील बबन बाळू मोरे (वय 65) यांच्या घरात घुसून बबन व त्यांच्या पत्नीचे हातपाय बांधून्। मारहाण करून सोन्या-चांदीचे दागिने लुटण्यात आले होते.
बबन यांच्या पत्नीच्या गळ्यातील पाऊण तोळ्याचे मंगळसूत्र, अडीच ग्रॅमची कर्णफुले, घरातील दोन हजार रुपये रोख रक्कम, स्मार्टफोन पळविण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी 9 ऑगस्ट 2023 रोजी सदलगा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सोन्याचे दागिने व गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार बबन मोरे यांच्या नात्यातील एका तरुणानेच हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. चांदी चोरीप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी त्याला अटक केली होती. न्यायालयात हजर झाला नाही म्हणून त्याच्या अटकेसाठी वॉरंट काढण्यात आले होते. तब्बल दोन महिने कारागृहात असताना इतर आरोपींशी त्याची मैत्री झाली. बबन यांनी शेतजमीन विकली आहे. त्यामुळे त्यांच्या घरात भरपूर पैसा आहे, असे सांगत उर्वरित चार जणांना घेऊन त्याने दरोडा घातल्याचे उघडकीस आले आहे.









