अनैतिक संबंध उघडकीस येण्याच्या भीतीने विहिरीत ढकलले
बेळगाव : अनैतिक संबंध उघड होण्याच्या भीतीने पोटच्या मुलाचा खून करणाऱ्या बेल्लद बागेवाडी येथील महिलेला चिकोडी येथील सातवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप व सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सुधा सुरेश करीगार (वय 31) रा. बेल्लद बागेवाडी या महिलेला सातवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एल. चव्हाण यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. हुक्केरीचे तात्कालिन पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सरकारतर्फे वाय. जी. तुंगळ यांनी काम पाहिले. 22 ऑक्टोबर 2019 रोजी प्रवीण सुरेश करीगार (वय 10) या मुलाचा खून करण्यात आला होता. आईचे अनैतिक संबंध उघड झाल्याने हा प्रकार घडला होता. आपली आई परपुरुषासोबत असताना पाहून दहा वर्षाचा प्रवीण वडिलांना सांगण्यासाठी धावत जात होता. ही गोष्ट लक्षात आल्याने जर अनैतिक संबंध पतीला कळले तर जीवन बरबाद होणार, या भीतीने सुधाने आपल्याच मुलाचा खून केला होता.
अत्यंत चलाखीने प्रवीणला खाऊ आणण्यासाठी म्हणून 50 रुपये देऊन लहान मुलगा प्रज्वलसमवेत त्याला दुकानात पाठविण्यात आले होते. त्यांच्या पाठोपाठ आई सुधाही गेली होती. खाऊ घेऊन परत येणाऱ्या मुलांना गाठून 22 ऑक्टोबर 2019 रोजी दुपारी 2 वाजता प्रवीणला उदयकुमार पाटील यांच्या शेतजमिनीतील विहिरीत ढकलून आईने त्याचा खून केला होता. ही गोष्ट कोणालाही सांगितली तर तुलाही असेच संपवितो, अशी लहान मुलाला तिने धमकी दिली होती. सुरुवातीला विहिरीत पडून मृत्यू अशी या प्रकरणाची नोंद झाली होती. हुक्केरीचे तत्कालिन पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी यांनी तब्बल तीन महिन्यांनंतर संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून दहा वर्षीय प्रवीणचा मृत्यू घातपाताने झाल्याचे उघडकीस आणले होते. यासंबंधी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. खुनाचा गुन्हा शाबीत झाल्याने न्यायालयाने मुलाचा खून करणाऱ्या आईला जन्मठेप व सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.









