शहापूर गणेशोत्सव महामंडळाची मागणी : बैठकीत विविध विषयांवर चर्चा
बेळगाव : नाझर कॅम्प, वडगाव येथील विसर्जन तलाव विहीर ढासळल्याने विसर्जनासाठी बंद केला आहे. त्यामुळे जुने बेळगाव येथील विसर्जन तलावामध्ये श्री मूर्ती विसर्जनासाठी मोठी गर्दी होत आहे. एकतर जुने बेळगाव येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी क्रेनची संख्या वाढवावी. तसेच वडगाव परिसरात विसर्जनासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शहापूर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी आयोजित बैठकीत केली. नाथ पै चौक येथील साईगणेश सोसायटीच्या सभागृहात अध्यक्ष नेताजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाची बैठक पार पडली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विसर्जन तलाव स्वच्छ करणे, विसर्जन मार्गावरील ख•s बुजविणे, पथदीप सुरू करणे, मंडळाचे विद्युत बिल माफ करणे, हेस्कॉमसह जिओ केबल्सची उंची वाढविणे अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
अध्यक्ष नेताजी जाधव म्हणाले, शहापूर-वडगाव परिसरात दरवर्षी मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा होतो. कोणत्याही गणेश मंडळाची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घेतली पाहिजे. यावर्षी महानगरपालिकेने महिनाभरापूर्वीच एक कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी लवकरच महापौर, महापालिका आयुक्त व पालकमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहापूर, खासबाग, जुने बेळगाव, वडगाव येथील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. यावेळी रमेश सोंटक्की, अशोक चिंडक, नितीन जाधव, अनिल आमरोळे, हिरालाल चव्हाणसह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.









