जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही : शेती सुधारणा युवक मंडळातर्फे शेतकऱ्यांचे निवेदन : उपसंचालकांचाही पशुचिकित्सालय स्थलांतरित करण्यास नकार
बेळगाव : वडगाव येथील पशुचिकित्सालय स्थलांतर करण्याची तयारी पशुवैद्यकीय खात्याकडून सुरू आहे. येथे सुविधा नसल्याच्या कारणावरून स्थलांतरासाठी हालचाली सुरू आहेत. सदर चिकित्सालय स्थलांतरित झाल्यास वडगाव, जुने बेळगाव, शहापूर भागातील शेतकऱ्यांची अधिक गैरसोय होणार आहे. यासाठी सदर चिकित्सालय स्थलांतर करण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन शेती सुधारणा युवक मंडळातर्फे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना देण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून पशुचिकित्सालय स्थलांतर करण्याचा कोणताही विचार नसल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. शहरातील वडगाव, जुने बेळगाव, शहापूर या भागात शेती व्यवसायासह जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून येथील पशुचिकित्सालय शेतकऱ्यांना जनावरांच्या उपचारासाठी अधिक सोयीचे ठरत आहे. मात्र या ठिकाणी वीजजोडणी नसल्याकारणाने पशुवैद्याधिकाऱ्यांना गैरसोयीचे ठरत आहे. काही औषधे फ्रीजमध्ये ठेवणे आवश्यक असल्याने विजेअभावी अडचणीचे ठरत आहे. सदर जागा मनपाच्या व्याप्तीत असल्याने मनपाकडून वीजजोडणी करण्यासाठी परवानगी दिली जात नाही. या गैरसोयीमुळेच पशुवैद्यकीय खात्याकडून हे चिकित्सालय स्थलांतर करण्याचा विचार केला जात आहे. यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. चिकित्सालय स्थलांतरित झाल्यास या भागातील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. यासाठी स्थलांतर करण्यात येऊ नये, अशी मागणी शेती सुधारणा युवक मंडळ व शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली.
बळ्ळारी नाला सफाईची मागणी
याबरोबरच बळ्ळारी नाल्याची सफाई करण्यात आली नसल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी नाल्याचे पाणी परिसरातील शेतवडीमध्ये पसरले आहे. त्यामुळे हजारो एकर शेतीमधील पिकांचे नुकसान झाले आहे. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून, तत्काळ याकडे लक्ष देऊन नाल्याची सफाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव, शेतकरी नेते राजू मरवे, आर. के. पाटील, ए. एन. सातेरी, मनोहर हलगेकर, संतोष शिवणगेकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता
शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच निवेदन देण्याचा पवित्रा घेतल्यामुळे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारणे भाग पडले. दरम्यान, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पशुसंगोपन खात्याच्या उपसंचालकांना त्याचठिकाणी फोन लावून पशुचिकित्सालय स्थलांतरित करण्याची योजना आहे का? अशी विचारणा केली. दरम्यान, उपसंचालकांनी अशा प्रकारचा कोणताच प्रस्ताव नसून पशुचिकित्सालय स्थलांतरित करण्यात येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे चिकित्सालय स्थलांतरित होणार नसल्याचे स्पष्ट झाले.









