फळे-फुलांच्या आवकेत वाढ : विविध फळांची बाजारात रेलचेल
बेळगाव “: निज श्रावणमास दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारात फळे, फुले, आणि पूजेच्या साहित्याची आवक वाढली आहे. विशेषत: श्रावणासाठी बाजारपेठ सज्ज झाल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर मंगळवारी स्वातंत्र्य दिन आणि बुधवारी पारशी वर्षारंभ आहे. त्यामुळे बाजारात सोमवारी नागरिकांची वर्दळ पाहायला मिळाली. जुलै 18 पासून अधिक मासाला प्रारंभ झाला होता. 16 ऑगस्टला अधिक मास संपणार आहे. 17 ऑगस्टपासून निज श्रावणमासाला प्रारंभ होणार असून 15 सप्टेंबरपर्यंत संपणार आहे. विशेषत: श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यक्रम केले जातात. त्यामुळे या काळात फळे, फुले आणि पूजेच्या साहित्याची मागणी अधिक असते. त्यानुसार बाजारात पूजेचे साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. विशेषत: फळा-फुलांची आवक वाढली आहे. त्याचबरोबर श्रावणमासात उपवास केले जातात. त्यामुळे साबु, वरी, शेंगा, राजगिऱ्याचे लाडू आणि फळांना मागणी वाढणार आहे. किरकोळ बाजारात फळांची आवक वाढू लागली आहे. अलीकडे लोकप्रियता मिळालेल्या ड्रॅगन फ्रूटला मागणी वाढू लागली आहे. केळी 60 ते 80 रु. डझन, सीताफळ 160 रु. किलो, सफरचंद 140 ते 280 रुपये किलो, पेरू 100 रुपये किलो, डाळिंब 100 ते 180 रुपये किलो, विदेशी संत्री 160 ते 300 रुपये किलो, पपई 50 ते 60 रुपये नग, मोसंबी 60 ते 80 रुपये किलो, ड्रॅगन फ्रूट 200 ते 250 रुपये किलो, अननस 50 रुपयाला एक, किवी 120 रुपये किलो असा फळांचा दर आहे.
आता शिवालये फुलणार
श्रावण महिन्यात दर सोमवारी शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. त्यामुळे श्रावणात शहर परिसरातील शिवालये भाविकांनी फुलणार आहेत. त्यामुळे नारळ, केळी, पाने, अंबोती, हार, फुले आणि फळांची विक्री वाढणार आहे. याबरोबरच मंदिरांतून पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
फळांची आवक वाढली- राजू मंडोळकर (फळ विक्रेते)
श्रावणासाठी फळांची आवक वाढली आहे. विदेशी फळेही दाखल झाली आहेत. श्रावण महिन्यात फळांची विक्री अधिक प्रमाणात होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा फळांचे दर काहीसे वाढले आहेत. पूजा-अर्चा, धार्मिक कार्यक्रम आणि उपवासासाठी फळांची खरेदी होते.









