वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने राष्ट्रीय संघासाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून मिलाप मेवाडा यांना नियुक्त केले आहे. पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिकेपूर्वी ते संघात सामील झाले आहेत. नुकत्याच झालेल्या अबुधाबी सराव शिबिरात आणि जुलैमध्ये बांगलादेश दौऱ्यादरम्यान अफगाणिस्तान संघासोबत वेळ घालवल्यानंतर त्यांना हे पद दिले गेले आहे. मिलाप मेवाडा 1996 ते 2005 पर्यंत बडोदा आणि पश्चिम विभाग संघाकडून भारतात देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 11 प्रथमश्रेणी आणि 26 लिस्ट ए सामने खेळले. मेवाडा यांनी हैदराबाद क्रिकेट असोसिएशन, छत्तीसगड राज्य क्रिकेट संघटना आणि जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या पुरुष वरिष्ठ राज्य संघांचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. याशिवाय, मेवाडा यांनी व्हीव्हीएस स्पोर्टिंग अकादमी आणि बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या कोचिंग सेटअपमध्ये देखील सामील आहेत. त्यांना खेळण्याचा आणि क्रिकेट प्रशिक्षणाचा 32 वर्षांचा एकत्रित अनुभव आहे. अलीकडील काळात बांगलादेशविरुद्ध मालिकेत अफगाण संघाला त्यांनी मार्गदर्शन केले होते. विशेष म्हणजे, अफगाण संघाने बांगलादेशविरुद्ध 2-1 फरकाने वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. या कामगिरीच्या जोरावर मेवाडा यांची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून अफगाण बोर्डाने नियुक्ती केली आहे.