वृत्तसंस्था /नवी दिल्ली
केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी 77 व्या स्वातंत्र्यदिनी 954 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर केली. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे असिस्टंट कमांडंट लोकराकपम इबोमचा सिंग यांना गृह मंत्रालयाने राष्ट्रपती शौर्य पोलीस पदक जाहीर केले आहे. तसेच अन्य 229 पोलीस कर्मचाऱ्यांना वीरता पोलीस पदक, 82 पोलीस कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी पोलीस पदक आणि 642 पोलीस कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक प्रदान करण्यात येणार आहेत. 230 शौर्य पुरस्कार विजेत्यांमध्ये बंडखोरीग्रस्त भागातील 125 जवान, जम्मू आणि काश्मीर क्षेत्रातील 71 जवान आणि ईशान्य विभागातील 11 जवानांचा समावेश असल्याचेही गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच राज्यांतर्गत पुरस्कार विजेत्यांची नावे संबंधित राज्यांना कळविण्यात आली आहेत.









