14 पट वाढीसह नफा 9544 कोटींचा नफा: आगामी काळात विकासावर भर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतीय जीवन विमा निगमने (एलआयसी) 30 जूनला संपलेल्या पहिल्या तिमाहीमध्ये 9544 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. एक वर्षाच्या आधी पाहता हा नफा 683 कोटी रुपयांचा होता. एकंदर नफा पाहता एलआयसीने पहिल्या तिमाहीमध्ये नफ्यामध्ये 14 पट दमदार वृद्धी दर्शवली आहे. दुसरीकडे कंपनीने प्रिमीयम उत्पन्नातही लक्षणीय कामगिरी केली आहे. कंपनीने या अवधीमध्ये 98 हजार 363 कोटी रुपयांचे निव्वळ प्रीमियम उत्पन्न प्राप्त केले आहे. याशिवाय कंपनीचे एकूण उत्पन्न जूनच्या तिमाहीत 1 लाख 88 हजार 749 कोटी रुपयांवर पोहचलं आहे. जे मागच्या वर्षी समान अवधीत 1 लाख 68 हजार 881 कोटी रुपये इतके होते. जूनच्या तिमाही गुंतवणूकीतील उत्पन्न 90,309 कोटी रुपयांवर पोहचले आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने 36 लाख 81 हजार 764 पॉलीसींची विक्री केली आहे. तर मागच्या आर्थिक वर्षात याच अवधीत कंपनीने 32 लाख 16 लाख 301 पॉलीसींची विक्री केली होती.
काय म्हणाले मोहांती
कंपनीचे चेअरपर्सन सिद्धार्थ मोहांती म्हणाले की, आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील कामगिरी अभिमानास्पद असून येणाऱ्या काळातही कंपनी विकासाच्या पथावर अग्रगण्या असेल. आगामी धोरणांवर लक्ष केंद्रीत करत पॉलीसीधारक, समाभागधारक आणि कर्मचाऱ्यांच्या विश्वासाच्या बळावर व्यवसायात आणखी यश नक्कीच गाठू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.









