प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur News : दहशतवादी संघटनांसोबत लागेबांधे आणि टेरर फंडिंगच्या संशयातून शनिवारी कोल्हापूरात पुन्हा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने पुन्हा कोल्हापूरात छापेमारी केली.शनिवारी कोल्हापूरात तीन ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) निगडीत तीन पदाधिकाऱ्यांना या पथकाने ताब्यात घेतले आहे.त्यांना चौकशीसाठी पुणे, मुंबई येथे नेल्याचे समोर आले आहे.अत्यंत गोपनीयरित्या ही छापेमारी करण्यात आली असून याची कल्पना स्थानिक पोलिसांनाही नसल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर शहर,हुपरी,इचलकरंजी परिसरात छापेमारी करुन तीघांना ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. त्यांच्याकडून काही महत्वाची कागदपत्रे, लोखंडी हत्यारे जप्त केली आहेत.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात नवी दिल्ली येथे एप्रिल 2022 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारताला 2047 पर्यंय इस्लामिक राष्ट्र बनविण्याचा अजेंडा घेवून या संघटनेचे पदाधिकारी देशभरात कार्यरत असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.यानंतर गेल्या वर्षभरात एनआयएने देशभरात पीएफआयच्या हस्तकांवर छापेमारी करुन दोनशेहून अधिक जणांना अटक केली आहे.शनिवारी दिवसभर एनआयएच्या दिल्ली येथील पथकाने 5 राज्यातील 14 ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये केरला, कर्नाटक, महाराष्ट्र आणि पश्चीम बंगाल आणि बिहार येथील कन्नूर,मलप्पूरम,दक्षिण कन्नड,नाशिक, कोल्हापूर, मुर्शिबाद आणि कैथर या जिह्यांमध्ये ही छापेमारी करण्यात आली.
कोल्हापूर जिह्यात करण्यात आलेल्या छापेमारी बाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे.शहरातील एका ठिकाणी तर इचलकरंजी हुपरी परिसरात ही छापेमारी करण्यात आली आहे.या तीनही ठिकाणाहून तीघांना या पथकाने ताब्यात घेतले आहे.शनिवारी दुपार नंतर या पथकाने ही छापेमारी केली असून ताब्यात घेतलेल्या तीघांनाही चौकशीसाठी पुणे,मुंबई येथे नेण्यात आले आहे.30 हून अधिक अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली असून रविवार पहाटेपर्यंत ही चौकशी सुरु होती. या चौकशीमध्ये पथकाने महत्वाची कागदपत्रे, काही हत्यारे ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
तीघेही पीएफआयमध्ये सक्रीय
ताब्यात घेतलेले दोघे जण 30 ते 35 वर्ष वयोगटातील असून एक जण 45 वर्षाचा आहे.या तिघांकडून महत्वाच्या कागदपत्रांसह काही लोखंडी हत्यारेही जप्त केली आहेत.पीएफआयच्या पुणे येथील एका सभेत या तीघांचा थेट सहभाग होता. यावेळ पासून त्यांच्यावर वॉच ठेवण्यात आला होता.पीएफआयच्या सर्व चळवळीमध्ये हे सक्रीय असल्याचेही समोर आले ओह.
थेट दिल्लीतून छापेमारी
थेट दिल्ली येथील पथकानेच कोल्हापूरात छापा टाकला आहे.या छाप्याची माहिती एनआयएच्या पुणे,मुंबई येथील पथकांनाही नव्हती. याचसोबत स्थानिक पोलिस ही या पासून अनभिज्ञ होते.थेट दिल्ली पथकाच्या रडारावर आता कोल्हापूर आले आहे.
एनआयए पाचव्यांदा कोल्हापुरात
एनआयएकडून कोल्हापुरात चौथ्यांदा चौकशी करण्यात आली आहे.यापूर्वी 2016 मध्ये ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या समीर गायकवाडकडे चौकशी केली होती.अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील एका संशयीताकडेही एनआयएने चौकशी केली होती.तर 31 जुलै 2022 रोजी हुपरी परिसरात एनआयने छापे टाकले होते. तर 22 सप्टेंबर 2022 रोजी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष मौला नबीसाब मुल्ला (वय 38 रा. सिरत मोहल्ला, सुभाषनगर) याला सुभाषनगर येथून एनआयएच्या पथकाने अटक केली.
पुणे येथील तपास एटीएसकडून एनआयएकडे
पुण्यात अटक केलेले दहशतवादी आणि त्यांना आर्थिक रसद पुरविणाऱ्यांचे इसिस आणि अल सुफा या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे या गुह्याचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस)कडून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आला आहे.पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे सातारा,कोल्हापूर येथील जंगलात बॉम्बस्फोटाचे परिक्षण केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली होती.यानंतर कोल्हापूर निपाणी मार्गे आंबोलीला गेले होते.त्यांनी आंबोलीच्या जंगलामध्ये बॉम्बस्फोटाचे परिक्षण केले होते.तर चांदोली धरण परिसरातही रेकी करुन त्यांनी कोल्हापूर शहरा लगत एका गावामध्ये वास्तव्य केल्याची माहिती अधिक तपासात समोर आली होती.यानंतर स्थानिक पोलीस अलर्टमोडवर आले होते.हा तपास एटीएसकडून एनआयएकडे गेल्यानंतर या दोन शक्यतांची पडताळणी करण्यासाठी एनआयएचे पथक कोल्हापूरात आले होते काय अशी ही चर्चा पोलीस दलामध्ये आहे.









