बगल रस्त्याचा पर्याय निवडा : भोम ग्रामस्थांच्या सभेत संघटीत लढ्याचा निर्धार
फोंडा : फोंडा-पणजी राष्ट्रीय महामार्गाच्या नियोजित चौपदरीकरणामुळे भोम येथील केवळ चार घरे पाडली जाणार नसून गावातील 65 घरांसह येथील मूळ मंदिरांनाही धक्का लागणार आहे. सरकारच्या राजपत्रातून हे उघड झाले आहे. गावातील घरांवर बुलडोझर फिरवण्यापेक्षा सरकारने बगलरस्त्याचा पर्याय अवलंबवावा. अन्यथा या प्रकल्पाविरोधात गावच्या अस्तित्वासाठी संघटितपणे लढा देण्याचा निर्धार भोम येथील सभेत करण्यात आला. नियोजित महामार्गाचे चौपदरीकरण लोकवस्तीमधून करण्यास भोम गावातील लोकांचा विरोध असून मागील वर्षभरापासून त्याविरोधात पडसाद उमटत आहेत. काल रविवारी येथील श्री सातेरी मंदिरच्या प्रांगणात याच मुद्द्यावर जाहीर सभा झाली. गावातील घरे पाडून महामार्गाचे चौपदरीकरण करण्यापेक्षा बगलरस्ता या अंतिम पर्यायावर सरकारने विचार करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली. गोवा फॉरवर्डचे प्रमुख व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई व रिव्होल्युशनरी गोवन्सचे सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी सभेला उपस्थिती लावून भोम ग्रामस्थांच्या या लढ्याला दोन्ही पक्षांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. भोमवासीय एकसंध राहिल्यास संपूर्ण गोव्यातून या आंदोलनाला पाठिंबा मिळेल अशी हमीही त्यांनी दिली.
भाजपा सरकारचा दांभिकपणा उघडा पाडा : विजय सरदेसाई
आमदार विजय सरदेसाई म्हणाले, राज्य सरकारची इच्छा असल्यास दोन मिनिटात हा निर्णय बदलता येऊ शकतो. मात्र एका धनिकाची मालमत्ता वाचविण्यासाठी सरकारमधील काही घटक भोम गावातून हा चौपदरी मार्ग नेऊ पाहत आहेत. राज्यातील भाजपा सरकार हिंदूचा जयजयकार करते, तर दुसऱ्या बाजूने भोम गावातील हिंदू बांधवांची घरे व येथील प्राचीन मंदिरांवरून चौपदरी रस्ता नेऊ पाहत आहे. भाजपाचे हिंदुत्त्व हा बहुसंख्य हिंदुच्या मतपेढीसाठी चाललेला निव्वळ ढोंगीपणा आहे. भोम ग्रामस्थांनी आपले गांव व मंदिरांच्या अस्तित्त्वासाठी एकसंध होऊन हा लढा लढताना भाजपा सरकारचा हा दांभिकपणा संपूर्ण गोमंतकीय जनतेपुढे उघड करावा, असे आवाहन त्यांनी केले. या आंदोलनात कोर्ट, कचेरीपासून सर्व स्तरावर लढा देण्यासाठी भोमवासियांना गोवा फॉरवर्डचा पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.
परप्रांतीयांना मोकळीक, भूमिपुत्रांवर अन्याय : वीरेश बोरकर
राज्यातील भाजपा सरकार भोम गावावर बुलडोझर फिरवून हा चौपदरी रस्ता बांधू पाहत आहे. बगलमार्गाचा पर्याय उपलब्ध असतानाही स्थानिकांवर चाललेली ही जोरजबरदस्ती म्हणजे लोकशाही नसून सरकारची एकाधिकारशाही आहे, असा आरोप आमदार वीरेश बोरकर यांनी केला. परप्रांतीयांना कुठेही झोपडपट्ट्या उभारण्यास व गोव्यात स्थायिक होण्यास मोकळीक देणारे हे सरकार गेल्या अनेक पिढ्या भोम गावात वास्तव्य करणाऱ्या भूमिपुत्रांचे संसार व उदरनिर्वाहाची साधने उद्ध्वस्त करायला उठले आहेत. सरकारच्या या हुकूमशाही विरोधात संघटितपणे उभे राहिल्यास चौपदरी रस्ता गावातून नेण्याचा निर्णय बदलावाच लागेल, असे ते म्हणाले.
सरपंच, आमदारांकडून गडकरींची दिशाभूल
सभेला उपसरपंच शैला नाईक व पंचसदस्य सुनील भोमकर हे सातपैकी केवळ दोन पंचसदस्य उपस्थित होते. सरपंच दामोदर नाईक हे सभेला उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांनी त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला. सरपंच, स्थानिक आमदार व सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी संगनमताने केंद्रीय रस्ता वाहतूक व बांधकाममंत्री नितीन गडकरी यांची या चौपदरीकरणाविषयी दिशाभूल केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. चौपदरी रस्त्याची प्रक्रिया सुरू करताना ग्रामस्थांना अंधारात ठेवण्यात आले. सुऊवातीला केवळ चार घरांचे स्थलांतर करावे लागेल, असे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात सरकारी राजपत्रात 65 घरांवऊन हा रस्ता जाणार असल्याचे आता उघड झाले आहे. देवळांनाही धक्का लागणार आहे. कुठलीच जनसुनावणी न घेता, छुप्या पद्धतीने भू-संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. संपूर्ण गावाला सरकारने फसवले गेल्याचा आरोप सभेतील वक्त्यांनी केला. घरे व गाव वाचविण्यासाठी या प्रकल्पाविरोधात संघटीत लढा हा शेवटचा पर्याय असल्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. उपसरपंच शैला नाईक, माजी सरपंच व विद्यमान पंचसदस्य सुनील भोमकर, ग्रामस्थ सुर्या भोमकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष स्वप्नेश नाईक, सुनील, सुशांत नाईक, गोवा फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर व अन्य वक्त्यांनी सभेला संबोधित केले. सूत्रसंचालन संजय नाईक यांनी केले.









