दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयाजवळ निदर्शने
मडगाव : बेतकी-बोरी येथे होऊ घातलेल्या इस्कॉन प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे रस्ता केला जात असून शनिवारी या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असताना इस्कॉनचे काही भक्त त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यातील चार भक्तांना या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी जबर मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी या मागणीसाठी रविवारी इस्कॉन भक्तांनी मडगावात दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयाजवळ निदर्शने केली. यावेळी उपस्थितांनी ‘हरे रामा… हरे कृष्णा’चा गजर केला. इस्कॉन प्रकल्पाला आवश्यक असलेली सर्व मान्यता मिळालेली आहे. तरीसुद्धा त्याला काही हिंदू विरोधी घटकांकडून विरोध होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या प्रकल्पामुळे ड्रग्स व्यवसाय होईल, अशी भीती निर्माण केली जात आहे. पण, यात तथ्य नसून जर कोणी ड्रग्सच्या आहारी गेला असेल तर ‘नामजपा’च्या माध्यमातून त्याला बाहेर काढले जाईल. प्रकल्पासंदर्भात विनाकारण गैरसमज निर्माण केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
समाजहिताचे कार्य होणार
बेतकी-बोरी येथे श्रीकृष्णाचे मंदिर बांधून इस्कॉनचे केंद्र बनविले जाणार असून मूल्यवर्धित शिक्षण दिले जाणार आहे. तसेच येथील पर्यावरणाचे जतन केले जाईल. औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतीची लागवड केली जाईल. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई होऊ नये यासाठी पावसाचे पाणी साठवणारी प्रणाली राबविली जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी गो-शाळा बांधण्याचा प्रस्ताव आहे. गो-शाळेमुळे बेवारशी गुरांना निवारा तसेच रस्ता अपघातात जखमी होणाऱ्या गुरांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सुमारे 32 हजार चौरस मीटर जागेत हा प्रकल्प साकारणार असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकल्पासाठी सुमारे 17 वर्षांपूर्वी एका व्यक्तीने जमीन दिल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पाला अवघेच काही लोक विरोध करीत असून संपूर्ण बोरी गावचा या प्रकल्पाला विरोध नाही, असा दावा यावेळी करण्यात आला.
पोलीस संरक्षण द्यावे…
प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत रस्ता केला जात असून त्याला विरोध केला जात असल्याने, पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रकल्पाला सर्व आवश्यक असलेले परवाने घेण्यात आलेले आहेत. इस्कॉनचे संप्रदायी शांततापूर्ण वातावरणात हे काम करू इच्छितात. शनिवारी जी घटना घडली ती अन्यायकारक असून मारहाण करण्यात गुंतलेल्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे अशी मागणी करण्यात आली.
बजरंग दलाचा पाठिंबा
दरम्यान, इस्कॉनतर्फे श्रीकृष्णाचे मंदिर बांधले जात असून ते हिंदू बांधवांशी निगडीत आहे. सरकारच्या मदतीने काम होत असल्याने त्याला विरोध होऊ नये ही बजरंग दलाची इच्छा आहे. शनिवारी जी मारहाणीची घटना घडली आहे, त्याचा राष्ट्रीय बजरंग दलातर्फे निषेध केला जात असल्याचे नितीन प्रभुदेसाई म्हणाले. या मुद्द्यावर कृती करावी लागली तर बजरंग दल मागे राहणार नसल्याचे त्यांनी स्पष् केले.









