पावसानंतर वाढ : हंगाम अंतिम टप्प्यात : दमदार पावसाची अपेक्षा
बेळगाव : यंदाच्या खरीप हंगामात 7.11 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 6.11 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. जुलैअखेर झालेल्या पावसाने पेरणीचे क्षेत्र बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. हंगाम शेवटच्या टप्प्याकडे आला असून लवकरच पेरणी पूर्ण होणार आहे. यंदा दीड महिना उशिराने पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पेरणी आणि लागवडदेखील उशिराने होऊ लागली आहे. जुलै अखेरीस दमदार पाऊस झाला होता. त्यानंतर पेरणी आणि लागवडीला वेग आला होता. मागील 15 दिवसात पेरणीचे उद्दिष्ट बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 86 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. उर्वरित पेरणीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
खरीप हंगामात ऊस, भात, बटाटा, रताळी, भुईमूग, कापूस, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, तूर, मका, ज्वारी आदी पिकांची पेरणी व लागवड केली जाते. मात्र यंदा वळीव आणि मान्सून झाला नसल्याने पेरणी हंगाम लांबणीवर पडला होता. अखेर जुलै महिन्यात झालेल्या पावसाने पेरणी हंगामाला वेग आला आहे. जुलै शेवटच्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे नदी, नाले आणि जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाण्याचा वापर करून लागवड सुरू आहे. कृषी खात्याने ठेवलेल्या एकूण उद्दिष्टापैकी 6.11 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. केवळ 14 टक्के पेरणी अद्याप शिल्लक आहे. येत्या आठ दिवसात पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे यंदा पेरणी आणि लागवड बऱ्यापैकी झाली आहे. मात्र पुढील पिकाच्या वाढीसाठी दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. जिल्ह्यात भात, सोयाबीन, ऊस, भुईमूग, मका आणि ज्वारीचे क्षेत्र अधिक आहे. सर्वत्र पेरणीची कामे पूर्ण होऊ लागली आहेत. विशेषत: तेलबिया, पेरणीच्या कामांत वाढ झाली आहे. सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलाची लागवड वाढली आहे.
पोषक वातावरण- शिवनगौडा पाटील (कृषी खाते, सहसंचालक)
जिल्ह्यात 86 टक्के पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित पेरणीही सुरू आहे. हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. पावसाने पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बऱ्यापैकी पेरणी पूर्ण झाली आहे.









