भारताचा 8 गड्यांनी पराभव : किंगचे नाबाद अर्धशतक, शेफर्डचे 4 बळी
वृत्तसंस्था/ लॉडेरहिल
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील येथे झालेल्या पाचव्या आणि निर्णायक सामन्यात यजमान विंडीजने भारताचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव करून पाच सामन्यांची ही मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली. भारताच्या डावामध्ये सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक झळकवले तर विंडीजतर्फे शेफर्ड, होल्डर आणि अकिल हुसेन यांनी प्रभावी गोलंदाजी केली. भारताने 20 षटकात 9 बाद 165 धावा जमवल्या. त्यानंतर विंडीजने 18 षटकात 2 बाद 171 धावा जमवित हा सामना 12 चेंडू बाकी ठेवून 8 गड्यांनी जिंकला.
विंडीजच्या डावामध्ये किमान तीनवेळा पावसाचा अडथळा आल्याने खेळ थांबवावा लागला होता. विंडीजच्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अर्शदिप सिंगने मेयरर्सला झेलबाद केले. त्यांने 5 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 10 धावा जमविल्या. त्यानंतर किंग आणि पुरन याने दमदार फलंदाजी करत दुसऱ्या गड्यासाठी 12 षटकात 107 धावांची शतकी भागीदारी केली. विंडीजने पॉवर प्ले दरम्यानच्या 6 षटकात 61 धावा जमविताना 1 गडी गमविला. विंडीजचे पहिले अर्धशतक 31 चेंडूत तर शतक 61 चेंडूत नोंदविले गेले. विंडीजने 12.3 षटकात 1 बाद 117 धावा जमविल्या असताना पावसाळी हवामानामुळे खेळ थांबवावा लागला होता. पुन्हा खेळाला प्रारंभ झाल्यानंतर किंगने आपले अर्धशतक 38 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले तर पुरनसमवेत शतकी भागीदारी 67 चेंडूत पूर्ण केली. विंडीजने 150 धावा 99 चेंडूत झळकविल्या. दरम्यान तिलक वर्माने पुरनला पांड्याकरवी झेलबाद केले. त्याने 35 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारासह 47 धावा जमविल्या. किंग आणि हॉफ या जोडीने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. किंगने 55 चेंडूत 6 षटकात आणि 5 चौकारांसह नाबाद 85 तर हॉपने 13 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 22 धावा केल्या. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 52 धावांची भागीदारी केली. भारतातर्फे अर्शदिप सिंग आणि वर्मा यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. विंडीजच्या डावात 12 षटकात आणि 8 चौकार नोंदविले गेले.
तत्पूर्वी या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. अकिल हुसेनच्या पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर सलामीचा यशस्वी जैस्वाल झेलबाद झाला. त्याने 1 चौकारासह 5 धावा केल्या. अकिल हुसेनने आपल्या दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर भारताला आणखी एक धक्का देताना सलामीच्या गिलला पायचित केले. त्याने 1 चौकारासह 9 धावा जमवल्या. भारताची स्थिती यावेळी 2 बाद 17 अशी होती. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 30 चेंडूत 49 धावांची भागीदारी केली. चेसने स्वत:च्याच गोलंदाजीवर तिलक वर्माला टिपले. त्याने 18 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 27 धावा जमवल्या. भारताचे अर्धशतक 35 चेंडूत नोंदवले गेले. पॉवर प्ले दरम्यानच्या 6 षटकात भारताने 2 गडी गमवताना 51 धावा जमवल्या होत्या.
चौथ्या क्रमांकावर आलेला संजू सॅमसन शेफर्डच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 9 चेंडूत 2 चौकारासह 13 धावा जमवल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने 18 चेंडूत 1 षटकारासह 14 धावा केल्या. भारताचे शतक 81 चेंडूत फलकावर लागले. तसेच यादवने आपले अर्धशतक 3 षटकार आणि 3 चौकारासह 38 चेंडूत झळकवले. भारताने 15.5 षटकात 4 बाद 121 धावा जमवल्या असताना किरकोळ पावसाच्या सरी आल्याने काही वेळ खेळ थांबवण्यात आला होता. पुन्हा खेळाला प्रारंभ झाल्यानंतर शेफर्डने कर्णधार पांड्याला होल्डरकरवी झेलबाद केले. सूर्यकुमार यादव होल्डरच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्याने 45 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारासह 61 धावा जमवल्या. सूर्यकुमारचे टी-20 प्रकारातील हे 15 वे अर्धशतक आहे. अर्शदीप सिंग 8 धावावर असताना शेफर्डने त्याचा त्रिफळा उडवला. कुलदीप यादव आपले खाते उघडण्यापूर्वीच शेफर्डच्या गोलंदाजीवर पायचित झाला. अक्षर पटेलने 10 चेंडूत 1 षटकारासह 13 धावा जमवल्या आणि तो डावातील शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर झेलबाद झाला. भारताच्या डावात 8 षटकार आणि 12 चौकार नोंदवले गेले. भारताच्या डावात 11 अवांतर धावा मिळाल्या. त्यामध्ये 7 वाईड आणि 4 बाईजचा समावेश आहे. भारताच्या 150 धावा 116 चेंडूत फलकावर लागल्या. 19.4 षटकात भारताने 8 बाद 161 धावा जमवल्या असताना पुन्हा पावसाचे आगमन झाले पण तो त्वरित थांबल्याने खेळ सुरू केला. विंडीजतर्फे शेफर्ड सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 31 धावात 4 गडी बाद केले. अकिल हुसेन आणि होल्डर यांनी प्रत्येकी 2 तसेच चेसने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकात 9 बाद 165 (जैस्वाल 5, गिल 9, सूर्यकुमार यादव 45 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारासह 61, तिलक वर्मा 18 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 27, सॅमसन 2 चौकारासह 13, पांड्या 1 षटकारासह 14, अक्षर पटेल 1 षटकारासह 13, अर्शदीप सिंग 1 षटकारासह 8, मुकेशकुमार नाबाद 4, अवांतर 11, शेफर्ड 4-31, अकिल हुसेन 2-24, होल्डर 2-36, चेस 1-25).
विंडीज -18 षटकात 2 बाद 171 (किंग 6 षटकार व 5 चौकारांसह 55 चेंडूत नाबाद 85, मेयर्स 5 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 10, पुरन 35 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारासह 47, हॉप 13 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 22, अवांतर 7, अर्शदिप सिंग 1-20, तिलक वर्मा 1-17).