गृहमंत्री अमित शहांकडून अभिनंदन, स्टॅलीन यांच्याकडून बक्षिसाची घोषणा
वृत्तसंस्था/ चेन्नई, नवी दिल्ली
शनिवारी येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेचे चौथ्यांदा अजिंक्यपद मिळवणाऱ्या हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघावर मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय हॉकी संघाचे खास अभिनंदन केले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एम. स्टॅलीन विजेत्या भारतीय हॉकी संघाला 1.1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सप्टेंबर महिन्यात हेंगझोयु येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ सर्वाधिक पदके मिळवेल, असा विश्वास केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी व्यक्त केला.
शनिवारी चेन्नईमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर उपस्थित होते. नजीकच्या भविष्यकाळात जागतिक हॉकी क्षेत्रात भारतीय संघ पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत सर्वाधिक पदके मिळवेल असेही ते म्हणाले.
आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेतील यजमान भारत आणि मलेशिया यांच्यात शनिवारचा अंतिम सामना चुरशीचा झाला. या सामन्यामध्ये जवळपास 50 मिनिटांच्या कालावधीत मलेशियाने भारतावर दोन गोलांची आघाडी मिळवली होती. दरम्यान शेवटच्या 10 मिनिटांच्या कालावधीत भारताने आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर देत सामन्याला कलाटणी देताना तीन गोल नोंदवून मलेशियाचे आव्हान 4-3 असे संपुष्टात आणले. या स्पर्धेच्या इतिहासात भारतीय हॉकी संघ हा सर्वात यशस्वी म्हणून ओळखला गेला आहे. या स्पर्धेमध्ये चारवेळा विजेतेपद मिळवणारा भारत हा पहिला संघ असून त्यानंतर पाकचा दुसरा क्रमांक आहे. पाकने ही स्पर्धा आतापर्यंत तीनवेळा जिंकली आहे. भारतीय हॉकी संघ आगामी काही कालावधीत आपले गतवैभव प्राप्त करेल, असा विश्वास अनुराग ठाकुर यांनी व्यक्त केला.

मान्यवरांकडून अभिनंदन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आशिया चॅम्पियन्स हॉकी करंडक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे खास अभिनंदन केले आहे. शहा यांनी आपल्या ट्विटरवर हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे खास अभिनंदन केले असून प्रमुख प्रशिक्षक फुल्टॉन यांचेही त्यांनी कौतुक केले आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनीही विजेत्या भारतीय हॉकी संघाचे खास अभिनंदन केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.
भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक क्रेग फुल्टॉन यांनी या यशाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, भारतीय संघाने शेवटपर्यंत जोमाने खेळ करत अजिंक्यपद हस्तगत केले. दोन गोलांनी पिछाडीवर असतानाही भारतीय संघाने मानसिक दडपण न घेताना मिळालेल्या संधींचा पुरेपूर फायदा घेत विजेतेपद खेचून आणले. पेनल्टी कॉर्नर आणि पेनल्टी स्ट्रोकचा फायदा अचूक घेतल्याने भारताला ही स्पर्धा जिंकता आली. आता भारतीय हॉकी संघाची सत्त्वपरीक्षा पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई स्पर्धेत ठरणार आहे. या स्पर्धेतही भारतीय संघ अशीच दर्जेदार कामगिरी करेल असा विश्वास फुल्टॉन यांनी व्यक्त केला.
तामिळनाडूच मुख्यमंत्री सी. एम. स्टॅलीन यांनी विजेत्या भारतीय हॉकी संघाला 1.1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून त्यांनी भारतीय हॉकी संघाचे खास अभिनंदन केले आहे. कर्णधार हरमनप्रित सिंग, जुगराग सिंग तसेच आकाशदीप सिंग यांच्या कामगिरीमुळे भारतीय हॉकी संघाला ही स्पर्धा जिंकता आली असे ते म्हणाले. हॉकी इंडियातर्फे विजेत्या भारतीय हॉकी संघाला रोख रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे. भारतीय हॉकी संघातील प्रत्येक सदस्याला हॉकी इंडियातर्फे 3 लाख रुपये तर प्रशिक्षक वर्गातील प्रत्येक सदस्याला 1.50 लाख रुपये देण्यात येतील अशी घोषणा हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी केली आहे.









