काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा हल्लाबोल : छत्तीसगडमध्ये विकास योजनांचा शुभारंभ
वृत्तसंस्था/ जांजगीर (छत्तीसगड)
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे रविवारी छत्तीसगडमधील जांजगीर येथील काँग्रेस ट्रस्टच्या संमेलन कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मणिपूर हिंसाचार आणि संसदेच्या कामकाजाचा उल्लेख करत केंद्र सरकारसह पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर जळत आहे, 5 हजार घरांना आग लागली. हजारो लोकांना घरे सोडावी लागली आहेत. यावर पंतप्रधानांनी बोलावे अशी आमची इच्छा होती पण ते मौनव्रत धारण केल्याची टीका खर्गे यांनी केली.
काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर आपल्या पक्षाने दिलेल्या योगदानाची माहिती दिली. आमच्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मणिपूरला धाव घेत हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या लोकांची भेट घेतली. आमच्या अनेक खासदारांनी मणिपूर गाठून परिस्थितीचा आढावा घेतला. मणिपूरचा मुद्दा आम्ही संसदेत मांडून सरकारला जाब विचारला. मात्र, आमच्या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधानांनी दिली नाहीत. अविश्वास ठरावाला उत्तर देताना ते फक्त काँग्रेस आणि गांधी घराण्याची खिल्ली उडवत राहिले, असेही खर्गे म्हणाले. राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा केली. मात्र भाजप त्यांना केवळ नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने गरिबांच्या कामाचा आणि विकासाचा काही विचार केला असता तर बरे झाले असते, असा टोलाही त्यांनी मारला.
जांजगीरला जाण्यापूर्वी खर्गे दिल्लीहून थेट रायपूरला पोहोचले होते. येथील विमानतळावर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री भूपेश बघेल, उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव, सभापती चरणदास महंत, प्रभारी कुमारी सेलजा आणि पीसीसी अध्यक्ष दीपक बैज यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, नेते आणि अधिकारी उपस्थित होते.
विकासकामांचे लोकार्पण
जांजगीर येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी 467 कोटी 32 लाख 92 हजार ऊपयांच्या एकूण 1,043 विकासकामांची भेट जनतेला दिली. त्यापैकी 87 कोटी 24 लाख 21 हजार ऊपयांहून अधिक किमतीच्या 192 विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. याचदरम्यान खर्गे यांच्या उपस्थितीत 379 कोटी 78 लाख 71 हजार ऊपयांहून अधिक रकमेच्या 851 विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.









