वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाम गण परिषदेचे वरिष्ठ आमदार प्रदीप हजारिका यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अन् लोकसभा मतदारसंघांशी संबंधित अंतिम परिसीमन अहवालानत स्वत:चा अमगुरी मतदारसंघाचे अस्तित्व समाप्त करण्यात आल्याच्या विरोधात त्यांनी हे पाऊल उचलले आहे. तर रायजोर दल या विरोधी पक्षाने शिवसागर जिल्ह्यात परिसीमन अहवालाच्या विरोधात निदर्शने केली आहेत. तर ऑल तिवा स्टुडंट्स असोसिएशनने मोरीगाव मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य न झाल्याने या संघटनेने निदर्शने केली आहेत. परिसीमन अहवाल शुक्रवार प्रकाशित करण्यात आला असुन यात विधानसभा मतदारसंघांची संख्या 126 तर लोकसभा मतदारसंघांची संख्या 14 कायम ठेवण्यात आली आहे.
19 विधानसभा तर दोन लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असणार आहेत. तर 9 विधानसभा अन् एक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातेंसाठी राखीव असणार आहे. परिसीमन प्रस्तावात अमगुरी मतदारसंघ हटविण्यात येणार असल्याचे नमूद होते, परंतु आम्ही हा मतदारसंघ कायम ठेवण्याची मागणी केली होती असे हजारिका यांनी सांगितले आहे. हजारिका हे अमगुरी मतदारसंघात 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. हजारिका हे आसाम गण परिषदेचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा राजीनामा पक्षासाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.









