चालू वर्षामधील चौथी घटना : भारतविरोधी पोस्टर्स झळकली
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियामध्ये खलिस्तान समर्थकांनी शनिवारी रात्री उशिरा लक्ष्मी नारायण मंदिरात तोडफोड केली आणि मुख्य प्रवेशद्वारावर भारतविरोधी पोस्टर्स चिकटविली आहे. या मंदिरात एप्रिल 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूजा केली होती.
पोस्टरवर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरचे छायाचित्र आहे. या पोस्टरद्वारे निज्जरच्या हत्येतील भारताच्या भूमिकेची चौकशी कॅनडा सरकारने करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निज्जर विरोधात भारतीय तपास यंत्रणेने 10 लाख रुपयांचे इनाम घोषित पेले होते.

निज्जर हा खलिस्तान टायगर फोर्स या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता. कॅनडाच्या एका गुरुद्वाराबाहेर निज्जरची 18 जून रोजी 2 अनोळखी हल्लेखोरांनी हत्या केली होती. या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा खलिस्तान समर्थकांचा दावा आहे. तर कॅनडात खलिस्तान समर्थकांकडून हिंदू मंदिरात तोडफोड करण्याची ही चालू वर्षातील चौथी घटना आहे.
निज्जरच्या हत्येसंबंधी शिख फॉर जस्टिसकडून जारी पोस्टरमध्ये कॅनडातील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांची छायाचित्रे जोडण्यात आली आहेत. या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानचा पत्ता सांगणाऱ्यास 10 हजार डॉलर्स दिले जातील असे या पोस्टरवर नमूद आहे. दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू हा कॅनडातील भारतीय अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करू पाहत आहे.









