कंबोडिया या देशाच्या राष्ट्रीय ध्वजावर एका हिंदू मंदिराचे चित्र आहे. हे अंगकोर वाटच्या प्राचीन मंदिराचे चित्र आहे. प्राचीन काळात भारताबाहेर फैलावलेले हिंदू अन् बौद्ध धर्माचा प्रभाव यातून दिसून येतो. कंबोडिया एकेकाळी हिंदू राष्ट्र होते, जे नंतर बौद्धबहुल देशात रुपांतरित झाल्याचे मानले जाते.
कंबोडियाच्या ध्वजात मागील अनेक वर्षांमध्ये कित्येकदा बदल करण्यात आला आहे, परंतु दरवेळी याच्या ध्वजात मंदिराचे चित्र कायम राहिले. कंबोडियाचा हा राष्ट्रीय ध्वज 1989 मध्ये स्वीकारण्यात आला आणि 1993 मध्ये सरकारकडून याला पूर्ण मंजुरी मिळाली.

तसे पाहिल्यास कंबोडियाच्या ध्वजात 1875 पासूनच अंगकोट वाटच्या मंदिराला स्थान मिळाले होते, ज्यात वर आणि खालच्या बाजूला निळ्या रंगाच्या पट्ट्या होत्या आणि मध्ये लाल पट्टी तसेच मंदिराचे रेखाचित्र होते. कंबोडियाला 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर यालाच राष्ट्रीय ध्वजाचा दर्जा देण्यात आला, जो 09 ऑक्टोबर 1970 पर्यंत कायम राहिला. त्यानंतर देशाचे नाव बदलून ख्मेर प्रजासत्ताक करण्यात आले आणि लोन नोल यांनी यासाठी नवा ध्वज सादर केला. ख्मेर प्रजासत्ताक हे नाव 1975 पर्यंत कायम राहिले, त्यानंतर कंबोडियाचे नाव डेमोक्रेटिक कंपूचिया झाले, जे 1979 पर्यंत टिकले. त्यानंतर याचा ध्वज बदलला आणि पिवळ्या रंगातील तीन स्तंभयुक्त अंगकोर वाट डिझाइनसोबत लाल ध्वजाचा वापर झाला. कंपूचिया प्रजासत्ताक कंबोडियावरील व्हिएतनामच्या आक्रमणानंतर 1979 मध्ये स्थापन करण्यात आले होते.
1993 मध्ये सरकारने पुन्हा 1948 मधील ध्वजाला मान्यता दिली. आता हाच ध्वज कंबोडियाचा राष्ट्रीय ध्वज मानला जातो. कंबोडियाचे अनेकदा नाव बदलले, तसेच कित्येक राजवटी या देशात आल्या, परंतु नेहमीच याच्या ध्वजावर अंगकोर वाटचे मंदिर कायम राहिले. या देशाच्या ध्वजात मागील 170 वर्षांमध्ये 9 वेळा बदल करण्यात आला आहे. प्रसिद्ध अंगकोर वाट मंदिर हे 12 व्या शतकात महिधरपुरा राजांकडून निर्माण करण्यात आले होते. यात 5 मीनार असून या सर्व मीनारांना नेहमीच ध्वजावर वापरण्यात आलेल्या शैलीबद्ध आवृत्तीत चित्रित करण्यात आलेले नाही.
अंगकोर वाटला जगातील सर्वात मोठी धार्मिक संरचना असण्याचा मान मिळाला आहे. मूळ स्वरुपात हे हिंदू मंदिर म्हणून निर्माण करण्यात आले होते. राजा सूर्यवर्मन द्वितीयकडून तयार करण्यात आलेले हे मंदिर मूळ स्वरुपात भगवान विष्णूला समर्पित होते. 12 व्या शतकादरम्यान हे हळूहळू बौद्ध मंदिरात रुपांतरित झाले. याला ‘हिंदू-बौद्ध’ मंदिराच्या स्वरुपातही वर्णिले गेले आहे.









