अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले प्रपंचाची निर्मिती, वाढ आणि लय ही एक ईश्वरी लीला आहे. त्याच्या मनाला येईल तोवर हा खेळ चालू रहावा म्हणू त्यात तो आत्मारूपी चैतन्य घालतो. त्यामुळे ह्या खेळातील पात्रे सजीव होतात आणि ईश्वरी इच्छेनुसार किल्ली दिलेल्या खेळण्याप्रमाणे हालचाली करू लागतात. पण म्हणून त्यांना कोण खरी म्हणू लागला तरी ती खरी कशी होतील? परिपूर्ण परब्रह्माने निर्माण केलेला संसारच मुळी खोटा तिथं रूप, नाम, गुण, कर्म ह्यांना थारा तरी कुठून मिळणार? पण हे लक्षात न घेणारा माणूस मात्र भ्रम झाल्याप्रमाणे प्रपंच खरा मानतो आणि त्याबद्दल वेगवेगळ्या कल्पना करत बसतो. दोरीला साप समजणारा माणूस असाच भ्रमिष्ठ झालेला असतो. संसाराला खरं समजणारा मनुष्य स्वत:ला कर्ता समजतो आणि मिथ्या संसारात घडणाऱ्या गोष्टी खऱ्या समजून त्यातून प्राप्त होणाऱ्या सुखदु:खाचे भोग भोगतो. हा सर्व मायेचा खटाटोप असतो. असे हे मिथ्या प्रपंचाचे भान मनुष्य ठेवत असतो. प्रत्यक्षात आत्मवस्तू ही शुद्ध आणि स्वानंदघन असते. उद्धवा, निरनिराळ्या वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे तसेच शास्त्रांचे सार लक्षात घेऊन निरनिराळी उदाहरणे देऊन मी ब्रह्म परिपूर्ण अद्वय असल्याचे निरुपण केले परंतु माझे हे मनोगत स्वत:च्या ज्ञानामुळे उन्मत्त होऊन, अभिमानयुक्त वचनाने खोडून काढणारे पंडितही आहेत. त्यांचाही आपण विचार करू. त्या पंडितांचे मत असे की, प्रपंचाची प्रत्यक्ष अनुभूती येत असताना म्हणजे तो प्रत्यक्ष समोर दिसत असताना त्याला खोटे कसे म्हणावे? त्याला मिथ्या समजून एकच परिपूर्ण ब्रह्म सर्व चराचर व्यापून राहिले आहे असे अद्वैत मत कुणाला तरी खरे वाटेल का? ह्याउलट जर हे विश्व खरे आहे असे मानले तर अद्वैतच मिथ्या आहे असे म्हणावेसे वाटते. त्यांच्या म्हणण्यानुसार ते रूप, नाम, गुण, कर्म, पंचभूते तसेच आजूबाजूचा भवताल, हे सर्व ते परम सत्य मानतात. त्यांना हे सर्व खरे वाटते कारण त्यांना भ्रमाने पछाडलेले असते. त्यांना ज्ञानाभिमान छळत असल्याने ते आपण ब्रह्माचा अंश आहोत ही स्वत:ची खरी ओळख पूर्णपणे विसरलेले असतात आणि आज जी त्यांची तात्पुरती ओळख आहे तीच ते खरी मानून बसतात. वास्तविक पाहता निरपेक्षपणे आपल्या वाट्याला आलेले काम करून देहाच्या कैदेत पडलेला आत्मा ईश्वरात विलीन करणे हे मनुष्य जन्माचे ध्येय असायला हवे. ह्या जन्मातल्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा, वासना पूर्ण व्हाव्यात म्हणून, तसेच ह्या जन्मातल्या पापपुण्याचा भोग घेणे ह्या दोन कारणासाठी माणसाचा पुनर्जन्म होत असतो. हे टाळण्यासाठी माणसाने निरपेक्षपणे आपले कर्तव्य करावे म्हणजे त्याच्या कुठल्याही इच्छा अपुऱ्या राहणार नाहीत तसेच केलेल्या कर्माचे फल ईश्वराला अर्पण करून टाकावे म्हणजे त्याला पापपुण्याची बाधा होणार नाही. ह्या दोन्ही गोष्टीमुळे मृत्युनंतर त्याचा पुनर्जन्म होण्याची शक्यता निर्माण होत नाही. त्यामुळे त्याचा आत्मा इतर देहात प्रवेश न करता, मुक्त होऊन ईश्वरात विलीन होईल. परंतु ज्ञानाने अहंकारी झालेले पंडित स्वत:ही गोंधळलेले असतात आणि त्यांच्या जोरावर इतरांचीही दिशाभूल करतात. ते सध्याच्या जन्मातली त्यांची ओळख खरी मानतात. त्यांच्यासाठी विषयोपभोग व त्यातून मिळणारे सुख मुख्य असते. ते आणखीन आणखीन मिळावे ह्यासाठी पुण्यकर्मे करावीत, त्यातून मिळवलेल्या पुण्याच्या आधारे स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा असेच त्यांचे मत असते. त्यांचे हे असे मत होण्याला देहाभिमान हेच कारण असते. हा देहाभिमान सज्ञानी लोकांना अधम करून सोडतो. त्यांच्या कर्मामुळे त्यांना जन्ममरणाच्या चक्रात अडकावे लागते. पुन्हा स्वर्ग, पुन्हा नरक, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जननी जठरे मुक्काम हे असे सतत त्यांचे चालू असते. ह्याप्रमाणे हे पंडित लोक स्वत:च्या ज्ञानाला मूर्खपणाची जोड देऊन अहंकार आणि संसाराची आसक्ती किंवा ओढ ह्याला बळी पडतात.
क्रमश:








