ऑनलाईन टीम / तरुण भारत :
येत्या 15 ऑगस्टपासून राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये सर्व रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 28 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी आणि त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते. यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणीसाठी शुल्क द्यावे लागणार नाही. रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.
अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना
– आरोग्य संस्थेमध्ये येणाऱ्या रूग्णांची नि:शुल्क नोंदणी करणे
– बाह्यरूग्ण विभागामध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रूग्णांना बाहेरून औषध आणि इतर कंझ्युमेबल्स खरेदी करण्याकरिता चिठ्ठी देऊ नये.
– क्वचित प्रसंगी बाहेरील औषधी रूग्णांस देणे आवश्यक असल्यास आरकेएस अनुदानातून स्थानिकरित्या औषध खरेदी करून रूग्णांस मोफत उपलब्ध करून द्यावे.
– आरोग्य संस्थामध्ये होणाऱ्या इसीजी, एक्स-रे, सिटी स्कॅन, प्रयोगशाळेतील चाचण्यांसाठी शुल्क आकारु नये.
– आंतररूग्ण विभागामध्ये दाखल असलेल्या रूग्णांना डिस्चार्ज करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये.








