पुणे / प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटात सहभागी झालेले राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटचा राजीनामा देण्यापासून परावृत्त केल्याची माहिती समोर झाली आहे. दस्तुरखुद्द वळसे पाटील यांनीच याबाबतच्या चर्चेला दुजोरा दिला. आम्ही पवारांना सोडून कुठेही गेलेलो नाही, ते आमचे नेते होते आणि राहतील,’ असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केल्याने संभ्रमात आणखी भर पडली आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार आणि त्यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जाणारे दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे आयोजित चर्चासत्राच्या निमित्ताने प्रथमच ‘व्हीएसआय’मध्ये आले होते. या वेळी माध्यमांशी बोलताना वळसे पाटील यांनी ही माहिती दिली.
वळसे पाटील म्हणाले, या चर्चासत्रासाठी सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष, संचालक व अधिकारी उपस्थित होते. याच वेळी चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे उपस्थित होते, तर मी या चर्चासत्राला हजर होतो. केंद्राच्या धर्तीवर राज्यातील सहकार कायद्यात बदल करण्यासाठी एक मसुदा तयार करण्यात येत आहे. त्याबाबत पवारसाहेबांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.








