अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या राष्ट्रीय आयोग अध्यक्षांना मराठी गटाच्या नगरसेवकांचे निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
मराठी भाषिकांना त्यांच्या मूलभूत अधिकार आणि हक्कांपासून वंचित ठेवले जाते, हे खेदजनक आहे. मराठी भाषिकांना सरकारी कागदपत्रे मराठीतून मिळावीत, तसेच आमचे मूलभूत अधिकार आम्हाला मिळवून द्यावेत, अशा मागणीचे निवेदन मराठी गटाच्या नगरसेवकांनी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष न्या. नरेंद्रकुमार जैन यांना दिले आहे.
शनिवारी रवी साळुंखे यांच्या पुढाकाराने हे निवेदन देण्यात आले. यावेळी जैन यांनी आपण या मागणीचा विचार करू आणि योग्य तो निर्णय देऊ, असे आश्वासन दिले. रवी साळुंखे यांनी, सीमाभागात मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली व मराठीतून कागदपत्रे मिळावीत, या मागणीकडे जिल्हा प्रशासन सतत दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
येत्या 16 तारखेला होणाऱ्या महानगरपालिकेच्या बैठकीची नोटीससुद्धा कन्नडमधून देण्यात आली असून सातत्याने हा सापत्नभाव होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेविका वैशाली भातकांडे व अन्य नगरसेवक उपस्थित होते.









