पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून गोकाक फॉल्स प्रसिद्ध आहे. याठिकाणी पर्यटनाला येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर याठिकाणाचा लवकरच विकास करण्यात येणार असल्याचे जिल्हा पालकमंत्री व बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
शनिवारी गोकाक फॉल्सला भेट देऊन परिसराची पाहणी केली. पर्यटनस्थळाचा विकास होणे गरजेचे आहे. याठिकाणी फॉल्स पाहण्यासाठी दरवर्षी 3 ते 4 लाख पर्यटक भेट देतात. प्रवाशांची सुरक्षितता अत्यंत गरजेची आहे. यादृष्टिने सुरक्षाकामे लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवास उद्यम खात्याकडून गोकाक फॉल्सच्या विकासासाठी आवश्यक असणारी विकासकामांची माहिती घेण्यात आली आहे. लवकरच येथील विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रियांका जारकीहोळी, राहुल जारकीहोळी यांसह स्थानिक नेते, विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.









