अविश्वास प्रस्तावावरून पंतप्रधानांनी फटकारले
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मणिपूर हिंसाचारावर आम्ही सुऊवातीपासूनच संसदेत चर्चा करण्याच्या बाजूने होतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. विरोधी पक्षातील लोकांना फक्त राजकारण करायचे होते. त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला, नंतर मतदानाला सामोरे जाण्याऐवजी सभागृहातून पळून गेले. त्यांच्या या कृतीने विश्वासघात केल्याचेच स्पष्ट होते, असा हल्लाबोल शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर चढवला.
पश्चिम बंगालमधील हावडा येथे आयोजित भाजपच्या पंचायत राज परिषदेच्या कार्यक्रमात मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही माहिती दिली. बंगाल आणि मणिपूर हिंसाचारावर विरोधकांची भूमिका आणि त्यांच्या 9 वर्षांच्या कार्यकाळाबद्दलही पंतप्रधानांनी भाष्य केले. मणिपूरच्या मुद्यावर चर्चा करायची आहे, असे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व पक्षांना सांगितले होते. परंतु विरोधकांनी या विषयावर चर्चा होऊ दिली नाही, विरोधी पक्ष जनतेचा विचार करत नाही, त्यांना फक्त राजकारणाची काळजी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आम्ही संसदेत विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाचा पराभव केला आणि देशभरात नकारात्मकता पसरवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मतदान झाले असते तर अहंकारी युती उघड झाली असती, असेही ते पुढे म्हणाले.
संत रविदास मंदिर, स्मारकाची पायाभरणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मध्य प्रदेशातील सागरमधील बारतुमा येथे 100 कोटी खर्चाच्या भव्य मंदिराचे आणि संत रविदासांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन केले. त्यानंतर एका मेगा रॅलीला संबोधित करताना या मंदिर आणि स्मारकाच्या उद्घाटनासाठी मी नक्कीच येणार असल्याचे प्रतिपादन केले. मी वाराणसीचा खासदार असून ती संत रविदासांची जन्मभूमी आहे. मला संत रविदासांच्या स्मारकाची पायाभरणी करताना खूप आनंद होत आहे. संत रविदासजी मला पुढच्या वेळी इथे येण्याची संधी देणार आहेत. या सागर भूमीतून मी पूज्य संत रविदासजींना नमन करतो, असे पंतप्रधान सभेला संबोधित करताना म्हणाले.









