कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक : डेपसांग, डेमचोकमधून चिनी सैन्याच्या माघारीसाठी भारत आग्रही राहणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि चीन दरम्यान सुरू असलेल्या सीमा विवादावर 19व्या फेरीची बैठक सोमवार, 14 ऑगस्ट रोजी पूर्व लडाख सेक्टरमधील चुशुल-मोल्डो मीटिंग पॉईंटवर होणार आहे. भारताकडून कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक आयोजित केली जात आहे. चार महिन्यांपूर्वी या मुद्द्यावर 18 वी फेरीची बैठक झाली, पण त्यात कोणताही महत्त्वाचा निकाल लागला नाही.
भारतीय लष्करी अधिकारी सोमवारी होणाऱ्या बैठकीत डेपसांग आणि डेमचोकमधून सैन्य मागे घेण्याचा आग्रह धरणार आहेत. चीनने गेल्या अनेक महिन्यांपासून डेपसांग मैदानी भागात भारतीय गस्त रोखली आहे. डेपसांग मैदान आणि चार्डिंग निंगलुंग नाला (सीएनएन) येथून सैन्य मागे घेण्याची मागणी चीनने नेहमीच फेटाळली आहे. आता लष्करी अधिकाऱ्यांमधील बैठकीत पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) हटवण्याच्या भारताच्या प्रस्तावाला चीन कशाप्रकारे प्रतिसाद देते हे पहावे लागणार आहे.
लेफ्टनंट जनरल राशीम बाली करणार भारताचे नेतृत्व
चीनसोबत होणाऱ्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व 14-कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल राशीम बाली करणार आहेत. यासोबत परराष्ट्र मंत्रालय आणि आयटीबीपीचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. त्याच वेळी, दक्षिण शिनजियांग लष्करी तळाचे प्रमुख चीनच्या बाजूने नेतृत्व करतील. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) दोन्ही देशांमधील तणावावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही ब्रिक्सच्या बैठकीला हजेरी लावली होती. यादरम्यान त्यांचे चिनी समकक्ष वांग यी यांच्याशी सीमा विवाद आणि शांतता प्रयत्नांबाबत चर्चा झाली. त्यानंतर जयशंकर यांनी गेल्या 3 वर्षांपासून भारत-चीन सीमेवर सुरू असलेला तणाव हे आपल्या कारकिर्दीतील सर्वात कठीण राजनैतिक आव्हान असल्याचे वर्णन केले होते.
24 जुलै रोजी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे उपस्थित होते. डोवाल यांनी भारत आणि चीनमधील सीमावर्ती भागात सुरू असलेला तणाव संपवून द्विपक्षीय संबंध सामान्य करण्यावर भर दिला. तथापि, भारत-चीन संबंध केवळ दोन देशांसाठीच नव्हे, तर जगासाठीही खूप महत्त्वाचे आहेत यावर दोन्ही बाजूंनी एकमत झाले. यावेळी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी देखील उपस्थित होते.
चीनने गेल्या काही दिवसांपासून डोकलामजवळ सक्रियता वाढविली आहे. 2017 मध्ये डोकलाममध्येच भारत आणि चीनमध्ये वाद झाला होता. त्यानंतर 73 दिवसांच्या गतिरोधानंतर चिनी सैन्याला माघार घ्यावी लागली होती. चीनने उत्तर डोकलाममधील टापूंमध्ये बांधकामे केली असून सिंच-ला च्या दक्षिण पूर्वेस सुमारे 1 किलोमीटर अंतरावर एक बहुमजली इमारतही बनवित आहे. सिंच-ला च्या पश्चिमेकडील शिखरावर जवळजवळ 13 विद्युत खांबदेखील निदर्शनास येत आहेत.
भारत-चीनदरम्यान 2017 मध्येही वाद
2017 मध्ये चीनने डोकलामजवळ रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भारतीय सैन्याने हस्तक्षेप करत काम रोखले होते. चीन ज्याठिकाणी रस्ता बनवित होता तो भूतानचा प्रदेश होता. भूतानशी झालेल्या करारांतर्गत भारत भूतानच्या परिपूर्णतेचे रक्षण करण्यास मदत करतो. डोकलामचा काही भाग ‘ट्राय जंक्शन’ म्हणून ओळखला जात असून तेथे भारत, चीन आणि भूतानची सीमा आहे. येथे चीनने घुसखोरी केल्यास भारताला धोका संभवू शकतो.









