आम्हाला व्यवसाय करण्यासाठी रितसर परवाना देण्याची मागणी
बेळगाव : पोलिसांनी रिक्षाचालकांना रिक्षा स्टॅन्डवरूनच हटविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रिक्षाचालकांनी आता थेट महापालिकेकडे धाव घेतली. आम्ही गेली 25 वर्षे रिक्षा त्या ठिकाणी थांबवून व्यवसाय करत आहे. तेंव्हा रितसर आम्हाला परवानगीचे पत्र द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे ऑटोरिक्षा ओनर्स आणि चालक असोसिएशनच्यावतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. केवळ त्याच परिसरात नाहीतर इतर परिसरातही पोलिसांकडून त्रास होत असून आम्हाला व्यवसाय करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. हनुमान हॉटेलजवळ रिक्षा स्टॅन्ड आहे. 25 वर्षांपासून त्या ठिकाणी हे रिक्षा स्टॅन्ड असून अनेक रिक्षाचालक व्यावसाय करत आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी पोलीस अधिकारी येवून त्यांना तेथून हटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यावेळी रिक्षाचालकांनी विरोध केला असता आम्हाला रितसर महानगरपालिकेची परवानगी असेल तर दाखवा, असे पोलीस अधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांना सुनावले. त्यामुळे रिक्षाचालकांनी आता महापालिका आयुक्तांकडेच धाव घेतली आहे. शहरातील अनेक ठिकाणी आम्ही रिक्षा स्टॅन्ड सुरू केले आहेत. बऱ्याच वर्षांपासून आम्ही त्या ठिकाणी रिक्षा थांबवून व्यवसाय करत आहे. मात्र आता पोलिसांकडून आम्हाला त्रास होत आहे. तरी आम्हाला शहरातील विविध ठिकाणी व्यावसाय करण्यास मुभा द्यावी, महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी रितसर परवानगी द्यावी, अशी मागणी रिक्षाचालकांनी केली आहे. महापालिका आयुक्त नसल्यामुळे रिक्षाचालकांनी मनपा कार्यालयात निवेदन दिले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मन्सूर होनगेकर, सेक्रेटरी रफीक देवलापूर, गौतम कांबळे, संजीव भंडारी, झकारी खादरी, अब्दुल रजाक, अरीफ शेख, अश्पाक पठाण यांच्यासह रिक्षाचालक उपस्थित होते.









