अर्ध्याहून अधिक बंदावस्थेत, अपघाताला निमंत्रण : नागरिकांमध्ये तीव्र संताप
बेळगाव : बेळगाव शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत अनेक विकासकामे करण्यात आली. परंतु, प्रत्येक ठिकाणी कामांचा बोजवारा उडाल्याचे पहायला मिळते. स्मार्ट सिटीअंतर्गत अनगोळ मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठराविक अंतरावर शोभेचे पथदीप लावण्यात आले. लाखो रुपये खर्च करून लावण्यात आलेल्या दिव्यांचा प्रकाश मात्र नागरिकांना अनुभवता येत नाही. सुरुवातीचे काही दिवस अनगोळच्या मुख्य रस्त्यावर दिव्यांचा झगमगाट पहायला मिळाला. परंतु, काही दिवसांतच येथे अर्ध्याहून अधिक दिवे बंद अवस्थेत आहेत. अनगोळ मुख्य रस्त्यावर मोठी हॉस्पिटल, हॉटेल्स, स्वीट मार्ट्स आहेत. याचबरोबर हरिमंदिर असल्याने नागरिकांची नेहमी वर्दळ असते. परंतु, दिवे नसल्याने नागरिकांना अंधारातून ये-जा करावी लागत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक घालण्यात आले आहेत. बंद दिव्यांमुळे गतिरोधकच दिसून येत नाहीत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
दोन-तीन महिन्यांपासून रात्रंदिवस पथदीप सुरूच
चिदंबरनगर येथील तिसरे ते चौथे रेल्वेगेट दरम्यान असलेल्या रस्त्यावरील दिवे जवळपास दोन ते तीन महिन्यांपासून रात्रंदिवस सुरू आहेत. नवीन खांब बसविण्यात आले खरे, परंतु, त्यावर लावण्यात आलेले दिवे मात्र काही केल्या पेटत नाहीत. याकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिक अडचणीत सापडले आहेत.









