अमेरिकेत सामना, बरोबरी साधण्याच्या दृष्टीने भारतीय संघाचा राहील प्रयत्न, सलामीच्या जोडीचे अपयश ही चिंतेची बाब
प्रतिनिधी/ लॉडरहिल (अमेरिका)
भारताचा वेस्ट इंडिजविरुद्धचा चौथा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आज शनिवारी होणार असून त्यावेळी फलंदाज आणखी एक प्रभावशाली प्रयत्न करून मालिकेत बरोबरी साधण्याच्या दिशेने मोलाची मदत करतील, अशी आशा भारतीय संघ व्यवस्थापन बाळगून असेल.. तिसऱ्या टी-20 मध्ये भारताने विजय मिळवला असला, तरी विंडीज मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. शिवाय पाहुण्या संघाला फलंदाजीविषयी असलेल्या चिंता अजून दूर होऊ शकलेल्या नाहीत.
सूर्यकुमार यादवला आक्रमक पवित्र्यात फ्लिक करताना आणि तिलक वर्माला महत्त्वपूर्ण धावा काढून चांगले योगदान देताना पाहणे हे खरोखरच दिलासादायक दृश्य होते. पण भारताची सलामीची जोडी सतत ढासळत राहिली आहे. ईशान किशनला विश्रांती देऊन यशस्वी जैस्वालला टी-20 मध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली. पण सलग तिसऱ्या सामन्यात सलामीची जोडी प्रभाव पाडण्यात अपयशी ठरून केवळ सहा धावा काढू शकली. जैस्वाल पहिल्याच षटकात वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉयच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यापूर्वीच्या दोन सामन्यांमध्ये किशन आणि शुभमन गिल यांना पहिल्या यष्टीसाठी फक्त 5 आणि 16 धावा जोडता आल्या असून त्यामुळे मधल्या फळीवर दबाव आला होता.

भारत या सामन्यासाठी किशनला परत आणेल की नाही हे पाहावे लागेल. परंतु व्यवस्थापनाला विजय आवश्यक असलेल्या या सामन्यात सलामीवीरांकडून अधिक प्रभावी खेळाची आशा असेल. भारताकडे तळाशी चांगले फलंदाज नाहीत, त्यामुळे वरच्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी करणे गरजेचे बनले आहे. समतोल राखण्यासाठी भारताने अक्षर पटेलला सातव्या क्रमांकावर तैनात केले आहे आणि ते पाच गोलंदाज वापरण्याचे धोरण अवलंबू शकतात.
असे असले, तरी तिलक वर्माने ज्या पद्धतीने भार आपल्या तरुण खांद्यावर उचललेला आहे तो उल्लेखनीय आहे. 39 धावा (22 चेंडू), 51 धावा (41 चेंडू) आणि 49 धावा (37 चेंडू) हा क्रम हैदराबादचा सदर डावखुरा खेळाडू त्याच्या कारकिर्दीत मोठा टप्पा गाठण्यास सज्ज झाला आहे हे दर्शवून देतो. तो सध्या 69.50 च्या सरासरीने 139 धावांसह मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनलेला आहे.
सूर्यकुमारने ‘मुंबई इंडियन्स’मधील त्याचा सहकारी असलेल्या तिलक वर्माची भूमिका आणखी वाढण्याचे संकेत दिले आहेत. ‘आम्ही बऱ्याच दिवसांपासून एकत्र फलंदाजी केली आहे. आम्ही दोघे एकमेकांना चांगले समजून घेतो. तो खूप आत्मविश्वासाने फलंदाजी करतो आणि त्याने मला चांगली फलंदाजी करण्यासही मदत केली आहे, असे सूर्यकुमारने म्हटलेले आहे.
दुसरीकडे, गोलंदाजीचा विचार करता कुलदीप यादव तिसऱ्या टी-20 साठी संघात परतल्याने आणि त्याच्या कामगिरीमुळे भारताचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल. अंगठ्याला दुखापत झाल्याने तो दुसरा टी-20 सामना खेळू शकला नव्हता. या डावखुऱ्या फिरकीपटूने चार षटकांत 28 धावा देत तीन बळी मिळवले. वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरन हा संपूर्ण मालिकेत भारताला सतावत आलेला आहे. पण सदर डावखुरा फलंदाज बहरात येण्यापूर्वीच कुलदीपने त्याला उखडले. एकूणच पाहता कुलदीप, अक्षर, यजुवेंद्र चहल या तिन्ही फिरकीपटूंनी मागील सामन्यात चांगली कामगिरी केलेली असून भारताला आज सेंट्रल ब्रॉवर्ड स्टेडियमवर त्यांच्याकडून पुन्हा एकदा अशाच कामगिरीची आवश्यकता भासेल.
सुऊवातीच्या सत्रात येथील खेळपट्टी फलंदाजांना मदत करते, परंतु सामना जसजसा पुढे सरकत जातो तसतशी ती अनेकदा संथ बनत जाते, असे दिसून आलेले आहे. याचा पुरावा म्हणजे 13 सामन्यांपैकी 11 सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय नोंदविलेला आहे. वेस्ट इंडिज 2016 नंतर भारतावरील पहिला मालिका विजय नोंदविण्याच्या दृष्टीने या सामन्यातील संधी गमावू पाहणार नाही हे उघड आहे. अधिक चांगल्या प्रकारे सर्वंकष प्रदर्शन घडविण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.
संघ : भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज : रोव्हमन पॉवेल (कर्णधार), काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, शाई होप, रोस्टन चेज, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेद मॅककॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओशान थॉमस, ओडेस, ओडियन स्मिथ.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा., थेट प्रक्षेपण : डीडी स्पोर्ट्स.









