काँग्रेस नेते राहुल गांधींचा हल्लाबोल : अविश्वास ठरावावरील उत्तरावर मतप्रदर्शन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींच्या विश्वासदर्शक ठरावावरील भाषणावर भाष्य केले. मणिपूर जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत हसत होते, असे सांगत त्यांची ही कृती अशोभनीय असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान संसदेत मणिपूरवर दोन मिनिटे बोलले. मणिपूरमध्ये अनेक महिन्यांपासून आग लागली आहे, लोक मरत आहेत. बलात्कार होत आहेत, लहान मुलांना मारले जात आहे. मात्र, पंतप्रधान हसत हसत बोलत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. हे पंतप्रधानांना शोभत नाही. मणिपूरसंबंधी विश्वासदर्शक ठराव मांडलेला असताना पंतप्रधान केवळ काँग्रेस पक्षावरच बोलत राहिले, असेही राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मी जवळपास 19 वर्षांपासून राजकारणात आहे आणि आम्ही जवळपास प्रत्येक राज्यात जातो, मग पूर असो, त्सुनामी असो किंवा हिंसाचार असो. माझ्या 19 वर्षांच्या अनुभवात मी मणिपूरमध्ये जे पाहिले आहे, ते मी यापूर्वी कधीही ऐकले-पाहिले नव्हते असे सांगत अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. यापूर्वी संसदेतील आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी असाच दावा केला होता.
मणिपूरचे सध्या मैतेई आणि कुकी असे दोन भागात विभाजन झालेले आहे. मी माझ्या दौऱ्यात दोन्ही लोकांची वस्ती असलेल्या भागात पोहोचलो होतो. या दौऱ्यात तेथील स्थानिक लोकांनी एकमेकांप्रति संतापजनक भावना आणि वक्तव्ये केल्याचे आपण प्रत्यक्ष पाहिल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच मणिपूरमध्ये जे काही चालले आहे ते भारतीय सैन्य दोन दिवसांत थांबवू शकते. हा हिंसाचार तीन दिवसात थांबवा असे भारतीय लष्कराला सांगितल्यास लष्कर दोन दिवसात योग्य कारवाई करू शकते. पण पंतप्रधानांना मणिपूर आगीत जाळून टाकायचे आहे. ते विझवायचे नाही, असेही ते पुढे म्हणाले.









