गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
वृत्तसंस्था/ गांधीनगर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने या दोघांच्या याचिकेवर सुनावणी करत कुठल्याही प्रकारचा अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. गुजरात विद्यापीठाकडून दाखल मानहानी प्रकरणाच्या सुनावणीस अंतरिम स्थगिती देण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली होती. अहमदाबाद येथील एका न्यायालयाने यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक पदवीसंबंधी केजरीवाल आणि संजय सिंह यांनी केलेल्या कथित अपमानास्पद टिप्पणींवर गुजरात विद्यापीठाकडून दाखल मानहानी प्रकरणी दोघांनाही हजर राहण्याचा निर्देश दिला होता. यापूर्वी सत्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती. या आदेशाला आव्हान देत दोन्ही नेत्यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.









